अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पितापुत्र ठार

फैजपूर – शहरातील गुरुदत्त कॉलनीमधील रहिवाशी गोपाळ जी. पाटील वय ६६ व त्यांचा मुलगा खेमा गोपाळ पाटील वय ३५ हे दुचाकी क्रमांक एम. एच. १९ बी. डी. ५४४२ व्दारे आपल्या मूळ गावी चिखली ता. यावल येथे गेले होते व येथून शनीवारी सकाळी फैजपूर येथे परतत असताना भुसावळ रस्त्यावरील पिंपरूळ फाट्याजवळ सकाळी १० वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या भीषण अपघातात गोपाळ पाटील वय ६६ हे जागीच ठार झाले. तर खेमा पाटील हा गंभीर जखमी झाला. जखमीस जळगाव हलवले तर इतरांनी गोपाल पाटील यांचा मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणला. तिकडे गंभीर जखमी खेमा पाटील याला जळगावात उपचार मिळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा मृतदेह देखील यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याठिकाणी डॉ. प्रतिक तायडे यांनी मयतांवर शव विच्छेंदन केले. या अपघातात अशा पद्धतीने पिता-पुत्र ठार झाल्या मुळे फैजपूर शहरात शोककळा पसरली आहे. मयत खेमा पाटील यांच्या पश्चात म्हातारी आई, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी फैजपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर याप्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञात वाहन चालका विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनाचा शोध सह पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे सहकर्मचारी करीत आहे.