जिल्हाधिकारी आदेश

अनधिकृतरित्या महामार्गावरील दुभाजक तोडणाऱ्या हॉटेल/पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव, (जिमाका) दि. 2 – जिल्ह्यातून जाणारे महामार्ग व इतर रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी तयार केलेले दुभाजक काही हॉटेल, ढाबे व पेट्रोल पंप चालकांनी अनाधिकृतरित्या तोडल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून वाहतुक कोंडीही होत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिलेत.
            अपघात व अपघाती मृत्यु कमी करण्यासंदर्भात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न्‍ा झाली यावेळी त्यांनी वरील निर्देश दिलेत. या बैठकीस अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजपूत, वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रतितास 80 किमी ही आदर्श वेगमर्यादा घालून दिलेली आहे. त्यानुसार अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी या वेगमर्यादेचे पालन करावे. याकरीता रस्त्यांवर ठिकठिकाणी वेगमर्यादेचे बोर्ड लावण्याची सूचनाही त्यांनी केली. त्याचबरोबर शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी पारोळा व पाळधी येथील बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, वाहनांचे अपघात रोखण्यासाठी पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागाने एकमेकांशी समन्वय साधून उपायोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्यात.
            जिल्ह्यात जानेवारी ते जून 2020 या कालावधीत 327 अपघातांची नोंद झाली असून या अपघातामध्ये 213 व्यक्तींचा मृत्यु झाला असून 272 व्यक्ती जखमी झाल्या  आहेत. तर जानेवारी ते जून 2021 या कालावधीत 406 अपघात झाले असून यात 263 व्यक्तींचा मृत्यु झाला असून 192 व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  सर्वाधिक अपघात हे चाळीसगाव ग्रामीण, जळगाव एमआयडीसी, पाचोरा, अमळनेर, भुसावळ, चोपडा व नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत झाल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी बैठकीत दिली.
            जिल्ह्यात झालेल्या अपघातांपैकी 16 टक्के अपघात हे वळण रस्त्यांवर, 21 टक्के अपघात हे ओव्हरस्पीडमुळे तर 11 टक्के अपघात हे नशापाणी करुन वाहन चालविल्यामुळे झाल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक श्री. गवळी यांनी दिली.
            जिल्ह्यातील महामार्गांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याची माहिती प्रकल्प संचालक श्री. सिन्हा यांनी दिली. ही कामे करीत असतांना येणाऱ्या अडचणींची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
            या बैठकीत तरसोद ते चिखली, जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग, पाळधी ते तरसोद, खोटेनगर ते पाळधी फाटा, तरसोद ते फागणे, बऱ्हाणूपर ते अंकलेश्वर, जळगाव, औरंगाबाद, जळगाव ते चाळीसगाव आदि रस्त्यांच्या कामांबरोबरच या रस्त्यांवरीत वीजेचे खांब, पाईपलाईन, विद्यूततारा हरविण्याच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.