अनलॉक ४-धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी; शाळा मात्र बंद


नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज अनलॉक ४ जाहीर केलेला असून यात सप्टेंबरच्या उत्तरार्धापासून धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा कॉलेज मात्र बंदच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
३१ ऑगस्ट रोजी संपणार्या अनलॉक ३ चा पुढील टप्पा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. अनलॉक ३ टप्पा ३१ ऑगस्ट रोजी संपत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानं अनलॉक ४ जाहीर केला आहे. अनलॉक ४मध्ये सास्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा महाविद्यालये सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहणार आहे. यासाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार २१ सप्टेंबर पासून राजकीय, क्रीडा, सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. यात १०० लोकांपेक्षा जास्त नसावेत असे मात्र नमूद करण्यात आले आहे. तर मेट्रो रेल्वे सेवा ७ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याचेही यात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, अनलॉक ४ मध्येही शैक्षणिक संस्था आणि खासगी कोचींग क्लासेसला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. यामुळे ३० सप्टेंबर पर्यंत तरी शाळा वा कॉलेज सुरू होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.