अमळनेमध्ये कोरोनाने घेतला पत्रकाराचा बळी

अमळनेर – येथील एका वृत्तपत्राचे संपादक असलेल्या पत्रकाराचा कोरोनाने काल बळी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली.
अमळनेर तालुका काही दिवसांपासून कोरोना पार्श्वभूमीवर खुच संवेदनशील झालेले आहे. अश्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता समाजमनाचा आरसा बनून वृत्तांकन करीत आहेत. अश्यातच एका साप्ताहिकाचे संपादक संजय मरसाळे यांना कोरोनाची लागण झाली व ते या गंभीर आजाराशी गेल्या पंधरा दिवसांपासून दोन हात करत असतांना मात्र कोरोना या राक्षसी आजाराने त्यांचा बळी घेतला. परखड व्यक्ती व सामाजिक भान ठेवून लिखाण करणारा पत्रकारिता मधील एक सच्चा मित्र काळाच्या ओघात पडदयाआड झाल्याने अमळनेर पत्रकार परिवारावर शोककळा पसरली, काहींनी तर काळा दिवस म्हणून घोषित केले. त्यांच्या जाण्याने समाजातील प्रतिष्ठित वकील,डॉक्टर, शासकीय अधिकारी,राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्या प्रति शोकसंदेश पाठवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने कोरोना या संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले आहे.
दरम्यान दवाखान्यात असतांना पत्रकार बांधवां सह अनेक मान्यवरांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, वयोवृद्ध आई-वडील,एक मुलगी-मुलगा असून सात जन्माचे दारिद्र्य आहे.शासनाने सदर कोरोना योद्धा च्या कुटूंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जनमानसात होतांना दिसत आहे.