अमळनेरमध्ये महिलांनी केला सराईत गुन्हेगाराचा खून

अमळनेर – जुन्या भांडणाच्या कारणावरून अमळनेर येथे तिघांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास धरणगाव रोड वरील म्हाडा कॉलनीत घडली. या प्रकरणी गुन्ह्यातील तिघांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , दिनांक ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाणे व कमल मुनिर फथरोड यांच्यात वाद होऊन जोरदार भांडण सुरू होते .एकमेकांना शिवीगाळ करत होते.त्यावेळी राजेश सिद्धी जाधव यांनी हे भांडण पाहिले , मात्र किरकोळ भांडण असल्याने मिटून जाईल म्हणून त्याने दुर्लक्ष केले.त्यांनतर सायंकाळी 7.30 ते 8 वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाणे , मुकेश गोकुळ सैंदाणे व भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी कमल फथरोड याला बोलावून घेतले आणि सायंकाळच्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी लाठ्या काठ्यांनी कमलच्या छातीवर , डोक्यावर , कपाळावर व हातावर बेदम मारहाण केली त्यात रक्तबंबाळ अवस्थेत कमल रस्त्यावर पडलेला होता.या दरम्यान कमलचा मृत्यू झालेला होता. घटनास्थळी शीतलच्या हातातील बांगड्या फुटून पडलेल्या होत्या. म्हाडा कॉलनी टाकरखेडा रस्त्यावर शहराबाहेर ४ किलो मीटर अंतरावर असल्याने खून होऊन २ तास उलटले तरी याबाबत भीतीने कोणीही वाच्यता करायला तयार नव्हते .रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी राकेश जाधव , पोलीस निरीक्षक अंबादास मोरे , व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत माहिती मिळाल्यावर शीतल , मुकेश व भाग्यश्री उर्फ भुरी यांचा शोध घेतला असता ते तिघे फरार झाल्याचे समजले. नंतर तिघांनी पातोंडा येथे एका ठिकाणी आश्रय घेतल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचत तेथून तिघांना अटक केली असून तिघांविरुद्ध खुनाचा व अॕट्राॕसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .