अमेरीका भारत-प्रशांत कमांड मुख्यालयाला भेट देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हवाई इथे पोहचले

अमेरीका भारत-प्रशांत कमांड (USINDOPACOM) मुख्यालयाला भेट देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 12 एप्रिल 2022 रोजी हवाई इथे पोहचले. त्यांचे वॉशिंग्टन डीसी इथून आगमन झाल्यावर USINDOPACOM चे कमांडर अॅडमिरल जॉन अॅक्विलीनो यांनी राजनाथ सिंह यांचे हवाईत स्वागत केले. USINDOPACOM आणि भारतीय लष्करात सातत्याने लष्करी सराव, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध प्रकारचे आदानप्रदान असे व्यापक सहकार्य आहे.
संरक्षण मंत्री, भारतात परतण्यापूर्वी 13 एप्रिल 2022 रोजी USINDOPACOM मुख्यालय, पॅसिफिक फ्लीट आणि हवाई येथील प्रशिक्षण सुविधांना भेट देतील. हवाई येथील त्यांच्या छोट्या मुक्कामादरम्यान पॅसिफिकच्या राष्ट्रीय युद्धस्मारक इथे पुष्पहार अर्पण करणे आणि यूएस आर्मी पॅसिफिक तसेच पॅसिफिक वायुसेनेच्या मुख्यालयाला भेट देणे अपेक्षित आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आभासी बैठक घेतली. यावेळी राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिनही उपस्थित होते.
त्यानंतर, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी 11 एप्रिल 2022 रोजी अमेरीकेच्या समपदस्थांबरोबर चौथ्या भारत-अमेरिका मंत्रीस्तरीय 2+2 संवादात भाग घेतला. या संवादानंतर एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. 2+2 संवादापूर्वी राजनाथ सिंह यांनी पेंटागॉनमध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यासोबत स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठक घेतली.