आरोग्यराजकीय

आरोग्य केंद्र हे सेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री वडेट्टीवार                                          

चंद्रपूर, दि. 31 मे : गोरगरीब जनतेसाठी त्या त्या परिसरातील शासकीय आरोग्य केंद्र हे आरोग्याचे मंदीर असते. वेदना घेऊन आलेला रुग्ण डॉक्टरांच्या उपचारानंतर बरा होत असला तरी त्याला मिळणा-या चांगल्या वर्तणुकीने तो 50 टक्के आधीच बरा होऊ शकतो. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी हे सेवेचे केंद्र व्हावे, अशी आशा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि कोरपना तालुक्यातील नांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आमदार सुभाष धोटे हे सुध्दा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.

अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे आज (दि.31) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, या चार पीएचसी मध्ये नांदा (ता. कोरपना), भंगाराम-तळोधी (ता. गोंडपिपरी), विरुर स्टेशन (ता. राजुरा) आणि शेणगाव (ता. जिवती) चा समावेश आहे. जिल्ह्यातील आणखी पाच नवीन आरोग्य केंद्राचे लोकार्पण लवकरच केले जाईल. या आरोग्य केंद्रात मॉड्युलर शस्त्रक्रिया विभागासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांचा प्रश्न तातडीने सोडवावा.

कोरोनाकाळात संपूर्ण जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यात कँन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असून त्यासाठी खर्रा आणि तंबाखूचे सेवन कारणीभुत आहे. त्यामुळे याबाबत कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीकरीता मंत्रीमंडळासमोर हा विषय मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

कॅन्सरच्या निदानासाठी तातडीने स्क्रिनिंग करा : आरोग्यमंत्री टोपे  

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कँन्सरच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली असून प्राथमिक स्तरावर स्क्रिनिंग झाले तर वेळेवर योग्य उपचार मिळून मोठा धोका टळू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने कँन्सरचे निदान करण्यासाठी तातडीने स्क्रिनिंग करावे, अशा सुचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

पुढे श्री. टोपे म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वेगवेगळ्या ठिकाणी बसून चंद्रपूर जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राचे एकाच वेळी लोकार्पण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. राज्यात सद्यस्थितीत 1839 प्रा. आ. कें. असून 10673 उपकेंद्र आहेत. या माध्यमातून आरोग्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. संसर्गजन्य रोग नियंत्रण तपासणी नियमित होत असली तरी असंसर्गजन्य रोगांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. मानसिक आरोग्य, दंत, नाक-कान-घसा आदी 13 प्रकारच्या सेवा उपकेंद्रातून दिल्या जातात. त्यामुळे या उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिका-याची 100 टक्के पदे भरावी. तसेच आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांचे गावागावात नियमित भेटी होतात की नाही, याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांनी लक्ष द्यावे.

एखाद्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीत खाजगी डॉक्टरांची सेवा शासकीय यंत्रणेत घेऊ शकतो, तसा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवावा. चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या आणि अंतर लक्षात घेता जिल्ह्यात आणखी प्रा. आ. कें. व उपकेंद्राची आवश्यकता असल्यास तशी मागणी करावी. जिल्ह्याला आरोग्याविषयक सर्व बाबी देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी मांडवा आणि पाटण येथे प्रा.आ.केंद्राच्या नवीन इमारतीची तसेच तालुका आरोग्य अधिका-यासह इतर रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी आरोग्य मंत्र्यांकडे केली.

कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी, संबंधित प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्स, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह गावकरी त्या त्या ठिकाणी उपस्थित होते

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.