महाराष्ट्रराजकीय

इर्शाळगड घटनेतील मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत व जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार-ना.अनिल पाटील मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री

कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव, दि.२० जुलै रायगड जिल्ह्यातील खालापूर नजीक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत व जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. शासन परिस्थितीवर आणि मदत- बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आज येथे दिली‌.

ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने मी स्वतः, ग्रामविकास, पर्यटन आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत आदी घटना स्थळी उपस्थित आहेत.

एनडीआरएफच्या २ चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण ४८ कुटुंब येथे आहेत.

सुमारे ७५ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button