क्राईम/कोर्टमहाराष्ट्र

मलकापूर येथे दोन खाजगी बसच्या भीषण अपघातात 7 ठार, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त,मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

मलकापूर दि:29 बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात झालेला आहे. मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती भीषण अपघात झाला आहे. दोन खाजगी ट्रॅव्हल्स समोरासमोर जोरदार धडकल्याने सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहेत. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच 08. 9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील 19 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शोक व्यक्त
मलकापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत.
या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून 19 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button