राजकीय

एसटीच्या सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी प्रयत्न करू- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१: मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या ३ हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केले असून सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्या करण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रोड येथील कार्यालयाच्या चाचणी मैदानावर उभारलेल्या २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या  हलक्या वाहनांसाठी ‘रोलर ब्रेक टेस्टर’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

जागेची अडचण असतानाही काटकोनात हा ब्रेक टेस्ट ट्रक बसवल्यामुळे वाहनमालकांची चांगली व्यवस्था झाली आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, वाहनांची योग्यता (फिटनेस) चाचणी करण्यासाठी ३० किलोमीटर लांब दिवे घाटात जावे लागत होते. त्यामुळे त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी तसेच प्रदूषण व्हायचे. त्याला आता या टेस्ट ट्रॅकमुळे आळा बसणार आहे.

पुण्याची वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी आराखडा

पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर विस्तारत असून वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी पुम्टा, पीएमआरडीएच्या माध्यमातून सर्वंकष वाहतूक आराखडा करण्यात येत आहे. मेट्रो, बीआरटी, रेल्वे, विमानतळाच्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबरोबरच सार्वजनिक वाहनतळ, बसस्थानके याबाबतही नियोजन सुरू आहे. रिंग रोड, मेट्रोच्या कामांना गती देण्यात येत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.