औरंगजेब “सेक्युलर”च्या व्याख्येत बसत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि-8 : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. मात्र यानंतर पुन्हा एकदा सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगर असा केला गेला. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे. औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाविषयी पत्रकारांनी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘त्याच्यात नवीन काय केलं मी…जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार’ यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, औरंगजेब हा काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही,असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
काँग्रेसची भूमिका मुख्यमंत्र्यांना समजावून सांगू -ना. बाळासाहेब थोरात
मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीनगरच्या या वक्तव्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, संभाजी महाराज आमचंही आराध्य दैवत आहे. नामांतराच्या कारणामुळं राजकारण होऊ नये. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना समजावून सांगू. काँग्रेसनं कायमच नामांतराला विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये किमान समान कार्यक्रमानं एकत्रितपणे काम करु. आम्ही आमची काँग्रेसची भूमिका एकत्र बसून मांडू आणि समजावून देऊ, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज जाहीर केलेल आहे.