
Eknath shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत काही दिवसांपूर्वी गुवाहाटी येथे गेलेले शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (mla shahaji patil) यांची एक ध्वनिफीत काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच जोरदार चर्चेत आहे. ‘मी सध्या गुवाहाटीत आहे,’ असे म्हणून, ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे…’ अशा शब्दांत आपली ख्यालीखुशाली या आमदारांनी आपल्या एका कार्यकर्त्यास फोनवरून कळवत असल्याबाबतची ही ध्वनिफीत आहे.
हेही वाचा : बंडखोर आमदार महाराष्ट्रात थांबले नव्हते,म्हणूनच काही करू शकलो नाही- शरद पवार
त्यावर काही गाणीही तयार झालेली असून असंख्य प्रमाणात मजेदार मीम्स सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. आता या चर्चेतून वेगळीच मागणी समोर आलेली असून, त्यांनी एक प्रकारे राज्यातील बंडखोर आमदार म्हणून नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटक आमदार म्हणून ख्याती मिळवलेली असल्याचे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रातील पर्यटन विभाग उत्तम प्रकारे सांभाळून महाराष्ट्रातील दऱ्याखोऱ्यातील डोंगरात लपून बसलेली दुर्मिळ ठिकाणे उत्तम प्रकारे विकसित करून ते जगाच्या पटलावर सुप्रसिद्ध करू शकतात.अशी क्षमता त्यांना अवगत आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.त्यामुळे त्यांना राज्याचे पर्यटन राज्यमंत्री बनवावे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार शहाजी पाटील यांच्या समर्थकांच्या या मागणीला कितपत साथ देतात याकडे त्यांच्या समर्थकांसह महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.