आरोग्य

काळ्या बुरशीच्या आजाराच्या उपचारासाठी अँफोटेरीसीन-B या प्रतिबंधात्मक औषधाच्या पुरवठा व उपलब्धतेसाठी केंद्राचे प्रयत्न

नवीदिल्ली (वृत्तसंस्था)-केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना “संपूर्ण सरकार” दृष्टिकोनासह कोविड 19 व्यवस्थापनासाठी औषधे आणि निदान सामुग्रीची खरेदी करण्यात मदत करत आहे. एप्रिल 2020 पासून विविध औषधे, वैद्यकीय उपकरणे, पीपीई किट, मास्क इत्यादींची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून सक्रिय सहाय्य मिळत आहे.
अलिकडच्या काळात अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी काळी बुरशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्यूकरमायकोसिस रोगाने बाधित कोविड रूग्णांची संख्या वाढत असल्याचे नमूद केले आहे. काळी बुरशी रोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या अँफोटेरिसिन-बी या बुरशी रोधक औषधांचीही टंचाई असल्याचे वृत्त आहे.
अँफोटेरीसीन -बी औषधाचे देशांतर्गत उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय, औषधनिर्माण विभाग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) सक्रिय प्रयत्न करत आहेत. जागतिक उत्पादकांकडून पुरवठा सुरळीत करुन देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी प्रयत्न केले आहेत.
देशात सध्या अ‍ॅम्फोटेरिसिन-बी चे पाच उत्पादक आणि एक आयातदार  आहेत:
भारत सीरम्स अँड व्हॅक्सीन्स लि
बीडीआर फार्मास्युटिकल्स लि
सन फार्मा लिमिटेड
सिप्ला लिमिटेड
लाइफ केअर इनोव्हेशन्स
मायलन लॅब (आयातदार )
या कंपन्यांची उत्पादन क्षमता एप्रिल 2021 च्या महिन्यात अत्यंत मर्यादित होती. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनामुळे  देशांतर्गत उत्पादक, मे महिन्यात अ‍ॅम्फोटेरिसिन-बीच्या एकूण 1,63,752 कुपी उत्पादित करतील. जून 2021 महिन्यात हे उत्पादन 2,55,114 कुप्या इतके वाढवण्यात येईल.
या व्यतिरिक्त, या बुरशीजन्य औषधाची देशांतर्गत उपलब्धतेसाठी आयातीद्वारे पूरक प्रयत्न केले जात आहेत. मे 2021 मध्ये अँफोटेरीसीन -बीच्या 3,63,000 कुपी आयात केल्या जातील, ज्यायोगे देशातील एकूण उपलब्धता (देशांतर्गत उत्पादनासह) 5,26752 कुपी इतकी होईल.
जून 2021 मध्ये 3,15,000 कुपी आयात केल्या जातील. त्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यासह अँफोटेरीसीनची देशभरात उपलब्धता जून 2021 मध्ये 5,70,114 कुपी इतकी वाढवली जाईल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सक्रिय प्रयत्नांमुळे आणखी पाच उत्पादकांना देशात बुरशीरोधक औषध निर्मितीचा परवाना देण्यात आला आहे, हे आहेतः
नॅटको फार्मास्यूटिकल्स, हैदराबाद
अलेम्बिक फार्मास्युटिकल्स, वडोदरा
गुफिक बायोसायन्सेस लिमिटेड, गुजरात
एम्क्युअर फार्मास्यूटिकल्स, पुणे
लायका, गुजरात
एकत्रितपणे या कंपन्या जुलै 2021 पासून अँफोटेरिसिन-बीच्या दरमहा 1,11,000 कुपी तयार करण्यास प्रारंभ करतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि औषध निर्मिती विभाग या पाच उत्पादकांना सक्रियपणे काही उत्पादन आधी सुरु करता यावे म्हणून एकत्रित प्रयत्न करत आहेत जेणेकरून हा अतिरिक्त पुरवठा जून 2021 मध्ये सुरू होईल.
याव्यतिरिक्त  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय इतर जागतिक स्रोतांचा सक्रियपणे शोध घेत आहे जिथून अ‍ॅम्फोटेरिसिन-बी औषध आयात केले जाऊ शकते. काळ्या बुरशीजन्य आजाराच्या उपचारात वापरता येतील अशी इतर बुरशीरोधक औषधे देखील खरेदी करण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालय प्रयत्न करत आहे.


Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.