किटमध्ये रबरी लिंग आहे की “सेक्स टॉईज” ? “डेमो”साठी की वापरासाठी ? आशा वर्कर्स संभ्रमात

मुंबई – शारीरिक संबंध किंवा लैंगिक आरोग्याबद्दल बोलताना अनेक जणांना अवघडल्यासारखे होतं. पण त्याबद्दल शासनाकडून जनजागृती करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पातळीवर नेहमी प्रयत्न सुरूच असतात. राज्यातील ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाबद्दल जनजागृती करणाऱ्या आशा वर्कर्सच्या किटमध्ये एक रबरी लिंग समाविष्ट असल्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडालाय. याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच बुलढाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय ? हे पहिल्यांदाच घडलंय का ? आशा कर्मचाऱ्यांना अशी किट्स देण्यामागे शासनाची नेमकी भूमिका काय होती ?
काय आहेत कारणे ?
आशा कर्मचाऱ्यांनी काय-काय कामे करायची याची यादी खुद्द केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिलेली आहे.
कुटुंब नियोजन आणि लैंगिक आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठीच्या प्रशिक्षणासाठी हे किट आशांना दिलेलं होतं. त्यात महिलांना प्रसूतीबद्दलची माहिती देणे, गर्भनिरोध गोळ्या व औषधी आणि लैंगिक आजारांबद्दल माहिती पुरविणे ही कामे सुद्धा समाविष्ट आहे.
डॉक्टरांच मत काय ?
पुण्याचे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉ. सागर मुंदडा हे अशाप्रकारे डेमो देण्यासाठी मॉडे्ल्सचा वापर करण्याचं समर्थन करतात. ते म्हणतात, “तज्ज्ञांकडून आशा वर्कर्सना याबाबतीत प्रशिक्षण गरजेचं आहे, नुसती मॉडेल्स देऊन उपयोग नाही. आशा वर्कर्स ज्या भागात काम करतात त्या ग्रामीण भागांमध्ये अशिक्षित मंडळी मोठ्या प्रमाणात असतात. अशा ठिकाणी डेमोच्या माध्यमातून लोकांना या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजवता येऊ शकतात.”
“या गोष्टीकडे जरा खुल्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. यातून चुकीच्या धारणा पसरतील असा विचार करणं बरोबर नाही. कारण जर खुलेपणाने बोललं गेलं तर लोकांना गोष्टी नीट समजतात. जर लैंगिक गोष्टींबद्दल मोकळेपणाने चर्चा झाली नाही तर त्यातून चुकीची माहिती पसरण्याचा धोका जास्त असतो.
रबरी लिंग आहे कि सेक्स टॉईज ?
या किट मध्ये असलेलं रबरी लिंग हे “सेक्स टॉईज” सदृश्य दिसत आहे. यात सर्वात मोठी विचित्र गोष्ट म्हणजे हे रबरी लिंग डेमोसाठी आहे की वापरासाठी याबाबत खुद्द आशा वर्कर्स मध्ये संभ्रम आहे. तसेच घरात ठेवल्यास बालकांच्या हाती लागल्यास समजावताना पालकांची कुचंबणा होणार आहे. हा एक मोठा विचित्र मुद्दा असून आरोग्य मंत्री राजेश टोपे उद्या याबाबत स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.