आरोग्य

कोरोनाची लक्षणे जाणवताच नागरिकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी

जळगाव, (जिमाका) दि. 5 – जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी, नागरीकांनी घाबरुन न जाता कोरोनाची लक्षणे जाणवताच तपासणीसाठी स्वत:हून पुढे यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, काल (4 सप्टेंबर रोजी) जिल्ह्यात एकाच दिवशी 1063 नविन बाधित रुग्ण आढळल्याने जनतेच्या मनात भिती निर्माण होवू शकते. परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना संशयित रुग्णांची तपासणी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरु नये तर स्वत:हून तपासणीसाठी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना त्रास होवू नये याकरीता प्रतिबंधात्मक क्षेत्राचा परिसर कमी करण्यात आला आहे. या क्षेत्रातील नागरीकांची तपासणी प्राधान्याने करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मृत्यु होत असलेले बाधित रुगण हे बहुअंशी 60 वर्ष वयापेक्षा अधिकचे आहेत व त्यांना इतरही आजार आहेत. यावर मात करण्यासाठी मतदार याद्याचा आधार घेऊन 70 वर्षावरील नागरीकांची घरोघरी जाऊन तपासणीस प्राधान्य देण्यात येत आहे. बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्यानंतर त्या मृतदेहाची नातेवाईकांकडून ओळख पटवून घेतल्यानंतरच डेथबॉडी पॅक करण्यात येत आहे. तशा सुचना सर्व संबंधित यंत्रणांनाही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरणा नदीवरील बांभोरी पुल हलत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही अफवा असून हा व्हीडीओ गिरणा नदीवरील बांभोरी पुल अथवा मेहुणबारे येथील पुलाचा नसून तो चोपडा तालुक्यातील नदीवरील जुना व्हीडीओ आहे. याबाबत संबंधितांना सुचना दिल्या असून तो पुल दुरुस्तही करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या पार्श्वभूमीवर बांभोरी पुलाचीही पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग विभागास देण्यात आले असून जळगाव-फर्दापूर-औरंगाबाद रस्त्याच्या एक लेनचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्याही सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात मुग, उडीद, सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे जागेवर जाऊन लवकरात लवकर करण्याच्या सुचनाही सर्व संबधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.