आरोग्य

कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. 23 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : महाविकास आघाडी शासनाला प्रशासनाच्या कर्तृत्वाची मिळालेली साथ व जनतेची एकजूट त्यामुळे आजपर्यंत कोरोनावर मात केली, भविष्यातही त्याचा सामना करत राहू. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला येथील पाटोदा गावात ग्रामपंचायत इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे व प्राथमिक आरोग्य इमारत व इतर विविध विकासकामांचे व देवगाव ग्रामपंचायत इमारत व विविध विकासकामांचे उदघाटन पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,जयदत्त होळकर,वसंत पवार,मोहन शेलार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, कार्यकारी अभियंता शैलेजा नलावडे, तहसीलदार प्रमोद हिले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते,डॉ.शरद कातकडे, डॉ.भरत कुलथे, डॉ.मनोज गवई, पंचायत समिती सदस्य सुनीता मेंगाणे, पाटोदा सरपंच प्रताप पाचपुते, उपसरपंच रईस देशमुख, देवगावचे सरपंच वैशाली अडांगळे, उपसरपंच लहाणू मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, लोकांची सेवा करण्याची शिकवण नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिली असून या दोन्ही नेत्यांना अभिवादन करतो. तसेच 2004 साली मी आलो तेव्हा जिल्ह्याला 36 कोटी निधी येत होता आज तो निधी 800 कोटीपर्यन्त आणला आहे. असेच तुमच्या सगळ्यांचे सहकार्याने या पुढेही चांगला विकास घडवूया अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्याला उद्योग, पर्यटन कृषी इत्यादी क्षेत्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ओळख निर्माण करणार

कोरोना काळात विकासकामे करण्यावर मर्यादा येत होती परंतु आता शासनाने निधी खर्च करण्यासाठी परवानगी दिल्याने लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यापुढेही आरोग्य विभागांतर्गत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांसाठी कामे करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी भर देण्यात येईल. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याला उद्योग, पर्यटन कृषी इत्यादी क्षेत्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच कोरोनामुक्त गाव होऊन विकासाकडे वाटचाल करू असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले

कोरोनासारखी लक्षणे असतांना घरगुती उपचार न घेता वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत, जेणेकरून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, दोन वर्षांपूवी आरोग्य केंद्राचे भूमिपूजन झाले होते , पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याने दोन वर्षात इमारत उभी राहून तिचे उदघाटन आज संपन्न झाले आहे,ही समाधानाची बाब आहे. कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य विभागाने उत्कृष्ट काम करून आपले योगदान दिले असून आजही देत असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

कार्यक्रमात यावेळी कोरोनाकाळात सेवा देणारे डॉक्टर , आशासेविका , आरोग्य सेवक , सफाई कर्मचारी यांचा पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला.

पाटोदा येथील या कामांचे झाले भुमीपूजन व उद्घाटन

जनसुविधा अंतर्गत व लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारत २५ लाख रुपये, मुलभूत सुविधा अंतर्गत काटे मारुती सभामंडप १० लाख रुपये, मुलभूत सुविधा अंतर्गत दहेगांव-पाटोदा सभामंडप १५ लाख रुपये, १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्राम पंचायत कार्यालय समोर रस्ता कॉक्रीटीकरण करण्यासाठी १० लाख रुपये, १४ व्या वित्त आयोग अंतर्गत प्राथमिक शाळेस संरक्षण भिंत बांधकाम १० लाख रुपये, नागरी सुविधा अंतर्गत स्ट्रीट लाईट १० लाख रुपये, अल्पसंख्यांक विकास योजना अंतर्गत मुस्लीम भागात शादी खाना बांधकाम ७ लाख रुपये, जिल्हा परिषद अंतर्गत पशु वैद्यकीय दवाखाना बांधकाम ३० लाख रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत ३ कोटी ५५ लाख रुपये या कामांचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

देवगांव येथील या कामांचे झाले भुमीपूजन व उद्घाटन

जनसुविधा योजने अंतर्गत नवीन ग्राम पंचायत कार्यालय इमारत १२ लाख रुपये, देवगांव-कोळगांव रस्ता डांबरीकरण १० लाख रुपये, देवगांव-मानोरी रस्ता दुरुस्ती करणे १५ लाख रुपये, ग्रामीण क्षेत्र विकास निधी अंतर्गत देवी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे ५ लाख रुपये, नागरी सुविधा योजने अंतर्गत गोसावी बाबा मंदिर रस्ता कॉक्रीटीकरण ८ लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन आणि दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत आंबेडकर नगर येथे भूमिगत गटार कामासाठी १५ लाख रुपये, पशु वैद्यकीय दवाखाना इमारत ३० लाख रुपये, रमाई नगर येथे भूमिगत गटार करणे ५ लाख रुपये, जिल्हा परिषद सदस्य १५ व्या वित्त आयोग अंतर्गत दशक्रिया विधी पाणी टाकीसाठी ४ लाख रुपये , जिल्हा परिषद सदस्य १५ व्या वित्त आयोग अंतर्गत इंदिरा नगर येथे पाणी व्यवस्था ५ लाख रुपये, जनसुविधा अंतर्गत लिंगायत समाज स्मशानभूमी मध्ये निवारा शेड, बैठक व्यवस्था व रस्ता कॉक्रीटीकरण १५ लाख रुपये, आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत दशक्रिया विधी शेड 15 लाख रुपये या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.