कोरोना देवीची स्थापना, बोकडबळी देऊन पूजन

सोलापूर (वृत्तसंस्था)- सध्या संपूर्ण जगासह राज्यभरात कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे . सोलापुरातील शहरी भागांसह ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने गावकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे . बार्शी येथे सर्वाधिक बळी हे कोरोनामुळे गेल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन योग्य नियोजन करीत आहे तर लोकं कोरोनाला नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीतल्या पारधी येथे चक्क कोरोना देवीची स्थापना करण्यात आली असून या देवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडे, बकरे आदींचा बळी देवून पूजन केलं जात असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
अंधश्रद्धांना फुटलं पेव
बार्शी-सोलापूर रोडवर ही पारधी वस्ती आहे. या देवीची पुजा केल्याने कोरोनाची बाधा होत नाही अशी अंधश्रद्धा येथील स्थानिक नागरिक करत आहे. दगड ठेवून त्यालाच कोरोना देवी समजून पुजा केली जात आहे. एका ठिकाणी अनेक फोटो असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनामुळे कोरोनाआईच्या स्थापनेसह तिचे पूजन केल्याने आमचे वाईट होणार नाही, असे तेथील नागरिकांनी सांगितले.
बार्शीतल्या पाराबाई भगवान पवार यांनी आपल्या घरातील देवघरात लिंबू आणि इतर साहित्य ठेवून कोरोना देवीची प्रतिष्ठापणा केली असल्याचे सांगितले जात आहे तर “देवीच्या कृपेमुळे आम्हाला सर्दी, खोकला किंवा कसला त्रास नाहीये. इथे आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली असून देवीमुळे आमच्या केसालाही धक्का लागत नाही, ज्याचा त्याचा मान दिला तर काही होत नाही.” असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
पारधी वस्तीतील अनेकांची भावना अशी आहे की, कोरोना देवीमुळे कोरोना पासून रक्षण होत आहे, तर काही जणांना वाटतं की या देवी मुळे कोरोनातून सुखरुपपणे आपण बाहेर पडलो.