खदानीत दोन बहीणींचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पारोळा – पारोळा शहरातील तीन सख्ख्या बहिणी आपल्या आई सोबत दुपारी दोन वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी पारोळा धरणगाव रस्त्यावरील पोपट तलावाच्या खदानीत गेल्या असता, यावेळी कपडे धुण्यासाठी वापरात येणारी लाकडी मोगरी पाण्यात वाहू लागल्याने तिला काढण्यासाठी दोन्ही बहिणींनी खूप प्रयत्न केला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या त्यांना वाचवण्यासाठी आई व तिसऱ्या बहिणीने प्रयत्न केला असता , त्यात त्या सुद्धा थोडक्यात बचावल्या.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , डॉ आसिफ कुरेशी,जुबेर शेख यांनी दिलेल्या माहिती वरुन पारोळा शहरातील मोल मजुरी करणारे शेख रशीद हे शेतात कामावर गेलेअसता, त्यावेळी त्यांची पत्नी सायराबाई ही मुलगी आशियाबी शेख रशीद (वय 17) गुलनाजबी (वय 15) व रुखसार (वय 11) हे सर्व शहराबाहेरील पोपट तलावाच्या वाहत्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी दि.4 सप्टेंबर रोजी पारोळा शहरात जोरदार पाऊस झाल्याने पोपट तलाव व खदान परिसरात मोठा जलसाठा झाला होता. आणि याठिकाणी हे कुटुंब यावेळी कपडे धुण्यासाठी गेले असता कपडे धुता धुता अचानक लाकडी मोगरी एकीच्या हातातून सरकून पाण्यात वाहू लागल्याने गुलनाजबी हिने ती काढण्यासाठी पुढे पाऊल टाकताच ती पाण्यात बुडू लागली लागलीच तिला वाचवण्यासाठी रुखसार ही पुढे सरसावली असता ती ही पाण्यात बुडाली यावेळी त्यांची आई सायराबाई हिने पळत जाऊन जवळच्या नगरसेवक कैलास चौधरी यांच्या स्टोन क्रेशर वरील मजुरांना आरोळ्या मारीत बोलावले यावेळी तिसरी बहीण आशियाबी (वय 17) ही देखील पाण्यात बुडत असताना भैय्या चौधरी ,गोलू चौधरी आदींनी तिला वाचवले, दरम्यान या तलावात पाणी जास्त असल्याने गुलनाजबी व रुखसार यांचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. संपूर्ण पारोळ्यात यामुळे शोककळा पसरली.यावेळी काही पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी दोघां बहिणींचे मृतदेह बाहेर काढले. मनमिळावू आणि कष्टाळू स्वभाव असलेले आणि अत्यंत हलाकीची परिस्थिती असलेले शेख रशीद यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे समजताच नागरिकांनी कुटीर रूग्णालयात एकच गर्दी केली. यावेळी खासदार उन्मेश पाटील, नगराध्यक्ष करण पवार , नगरसेवक पी.जी. पाटील व इतरांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले.या घटनेची पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.