गाड्यांच्या प्रवासी आसन व्यवस्थेच्या भागामध्ये आगीच्या धोक्याची सूचना देणारी प्रणाली आणि आग संरक्षक प्रणाली बसविण्यासाठी अधिसूचना जारी

प्रवासी गाड्यांमध्ये ज्या भागामध्ये प्रवासी बसतात, त्या भागामध्ये गाडीमध्ये आग लागताच धोक्याचा गजर वाजून सूचना देणारी प्रणाली आणि आग संरक्षक प्रणाली बसविण्यासाठी यावी, या संदर्भातील अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दि. 27 जानेवारी, 2022 रोजी जारी केली आहे. यासाठी एआयएस म्हणजेच ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड- 135 नुसार टाईप-तीनच्या वाहनांच्या रचनेमध्ये आणि बांधणीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या टाईप-तीनच्या वाहनांचा उपयोग लांब पल्ल्याच्या प्रवासी वाहतुकीसाठी तसेच शालेय मुलांच्या वाहतुकीसाठी केला जातो.
सध्या, एआयएस- 135 नुसार इंजिनाच्या भागामध्ये आग लागली तर ते लक्षात येण्यासाठी गजर वाजवून सूचित केले जाते. प्रवासी गाड्यांना लागलेल्या आगींच्या कारणांचा आणि याप्रकारच्या अपघातांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले आहे की, इंजिनामध्ये बिघाड होवून आग लागल्यानंतर प्रवाशांना ते असलेल्या भागात निर्माण झालेली प्रचंड उष्णता आणि धूर यामुळे जास्त दुखापत होते आणि त्रास होतो. प्रवासी गाडीला आग लागली तर आत निर्माण झालेल्या उष्णतेचे व्यवस्थापन करून गाडीतल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी थोडा जास्त वेळ मिळू शकतो तसेच उष्णता आणि धूर यांना नियंत्रित केले तर प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण कमी करता येईल किंवा टाळताही येऊ शकेल.
यासाठी गाडीमध्ये पाण्याच्या वाफेवर आधारित सक्रिय अग्निसुरक्षा प्रणाली आणि गाड्यांसाठी वेगळी आगीची सूचना देणारी गजर यंत्रणा ज्या भागात प्रवासी आहेत, त्या भागात बसविणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या भागातले तापमान 50 अंश सेल्सीअसच्या आत राखण्यासाठी गाड्यांची नवीन संरचना करावी लागणार आहे.
आगप्रतिबंधक नवीन प्रमाणित संरचना निश्चित करण्यासाठी या क्षेत्रातल्या संबंधित भागधारक आणि तज्ज्ञांबरोबर विचार विनीमय करण्यात आला आहे. यानुसार अग्निशमन तंत्रज्ञान, याविषयीचे जोखीम मूल्यांकन, तसेच सेंटर फॉर फायर एक्सप्लोझिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (सीएफईईएस), डीआरडीओ या संस्थेतील संबंधितांबरोबर चर्चा करण्यात आली आहे.