वृत्तविशेष

ग्रामीण पत्रकार विकासाचे दूत – माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर यांचे प्रतिपादन

सोलापूर, दि.१३ : समाज आणि पत्रकारांचे जवळचे नाते आहे. ग्रामीण भागातील घटना घडामोडी बातम्यांच्या रूपाने वृत्तपत्रात प्रसारित करण्याचे काम पत्रकार करीत असतात, यामुळे ग्रामीण पत्रकार हे विकासाचे दूत असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय, संदीप दादा गायकवाड बहुद्देशीय संस्था व मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. पाटोदकर उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील होते. यावेळी आमदार यशवंत माने, तहसीलदार प्रशांत दीडशे पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक सुजाता माळी, सहायक निबंधक विद्याधर माने, कोल्हापूर विभागाचे सहायक संचालक फारुख बागवान, माजी नगराध्यक्ष शाहीन शेख, माजी जि. प.सदस्या सीमाताई पाटील, शंकरराव वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग सुरवसे आदी उपस्थित होते.

शासन-प्रशासन आणि समाज यांना जोडणारा दुवा म्हणजे पत्रकार आहे. ग्रामीण भागातील विकासाचे बीज पत्रकार रोवतात, यामुळे ग्रामीण भागाचा कणा म्हणजेच पत्रकार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याकडून पत्रकारांना विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्या योजनांचा पत्रकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटोदकर यांनी केले. अशा प्रकारच्या कार्यशाळा ग्रामीण भागात पत्रकारांसाठी आयोजित करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधाबद्दल डॉ. पाटोदकर यांनी माहिती दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, ज्यांच्या हातात मोबाईल तो सध्या पत्रकार आहे. मोबाईलवर आलेल्या बातमीची शहानिशा करूनच ती इतरांना फॉरवर्ड करणे महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी प्रत्येक गोष्ट तपासून पडताळून पाहावी अन्यथा त्याचे पडसाद जनमानसात उमटतात. पत्रकारिता हे आगकाडीचे काम करीत असल्याने ही काडी खूप जबाबदारीने वापरणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक पत्रकाराने ग्रामीण भागातील बदल टिपून वृत्तांकन करणे महत्त्वाचे आहे. वृत्तपत्र हा उद्याचा इतिहास असल्याने पत्रकारांनी बातमी देताना खूप जबाबदारीने द्यावी. राजकीय पुढाऱ्यांचे भाषण देण्याऐवजी गावातील छोटे छोटे उपक्रम यांना महत्त्व देणे गरजेचे आहे.

पत्रकार हा जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करीत असतो. जनतेचा छापून आलेल्या बातमीवर विश्वास असतो, म्हणून बातमी छापून येण्यापूर्वी पत्रकारांनी विचारपूर्वक द्यावी. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी पत्रकार महत्त्वाचा आहे, पत्रकारांनी संवेदनशील जागरुकतेने सामान्य जनतेचे प्रश्न मांडणे गरजेचे आहे, असेही श्री. चोरमारे यांनी सांगितले.

पत्रकारांनी आपल्या व्यवसाय आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला हवे त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावली तर जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक नक्की होईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कृष्णलीला या साप्ताहिकाचे प्रकाशन करण्यात आले. संदीपदादा गायकवाड बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कौशिकतात्या गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी आमदार माने यांच्या हस्ते महादेव पासले यांना कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.