आरोग्य

चीनचा पर्दाफाश करणाऱ्या नेपाळी पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली/काठमांडू (एएनआय वृत्तसंस्था) – नेपाळच्या हद्दीत घुसखोरी करुन नेपाळचा भूभाग बळकाविणार्‍या चीनचा भांडाफोड करणारे नेपाळचे पत्रकार बलराम बनिया यांचा गूढरित्या मृत्यू झाला आहे. चीनने नेपाळच्या रुई गावावर ताबा मिळवला असून सुमारे ११ ठिकाणी घुसखोरी केल्याचे बनिया यांनी उघड केले होते. या वृत्तानंतर नेपाळमध्ये ओली सरकार तसेच चीनविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बलराम बनिया बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. दोन दिवसांपूर्वी बलराम यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यामुळे नेपाळ सरकारवरील टीकेची धार तीव्र झाली आहे.
बलराम बनिया हे नेपाळी  वृत्तपत्र कांतीपूर दैनिकात सहाय्यक संपादक होते. चीनने तिबेटच्या सीमेवरील रुई नावाच्या गावावर मागील तीन वर्षांपासून कब्जा मिळवला असून अन्य ११ ठिकाणी घुसखोरी केल्याचे वृत्त बनिया यांनी गेल्याच महिन्यात प्रसिद्ध केले होते. कांतीपूर दैनिकात चीनच्या घुसखोरी संदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नेपाळमध्ये चीनच्या विरोधात जनक्षोभ माजला होता. राजधानी काठमांडूमधील चीनच्या दूतावासासमोर निदर्शनेही झाली होती. तर नेपाळी जनतेने चीनच्या या घुसखोरीविरोधात तसेच नेपाळमधील चीनधार्जिण्या ओली सरकारविरोधात भारताकडे सहाय्य मागितले होते.
चीनने याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला होता. इतकेच नाहीतर चीनने वृत्तपत्राच्या व्यवस्थापनावर ही बातमी काढून टाकण्यासाठी दबाव आणला होता. त्याचबरोबर बनिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावत त्यांना एका महिन्याच्या सुट्टीवर पाठविल्याचे काही वृत्तपात्रांनी म्हटले होते. या सर्व घटनांनंतर १० ऑगस्टपासून ते बेपत्ता झाले होते. बलराम यांच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. मात्र १२ ऑगस्टला त्याचा मृतदेह नदीकाठी सापडला. त्यांची हत्या झाली असून यामागे चीन असल्याचा संशय व्यक्त केला जातो.
दरम्यान, भारत-नेपाळ सीमा जोडणार्‍या सोनौली सीमेवर संशयास्पदरित्या भटकणाऱ्या तीन चिनी नागरिकांना भारतीय जवानांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. नेपाळमार्गे चीनकडे जाण्यासाठी हे तिघे दिल्लीहून सोनौलीला पोहोचले असल्याची माहिती चौकशीत समोर येत आहे. त्यांच्याकडून भारतात राहण्यासाठी अधिकृत व्हिसा आणि पासपोर्ट आढळला आहे. भारताच्या इमिग्रेशन विभागाने त्यांना नेपाळ जाण्यासाठी परवानगी दिली होती, मात्र नेपाळच्या इमिग्रेशन विभागाने त्यांना परवानगी नाकारली होती अशी माहिती समोर येत आहे.
भारत आणि नेपाळमध्ये मागील काही दिवसापासून तणाव निर्माण झाला असून हा तणाव चर्चेद्वारे सोडवता येईल, असे नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ज्ञवाली म्हणाले. कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेखमध्ये काही नेपाळी नागरिक अवैध्यरित्या दाखल होत असल्याचे समोर आले आहे. नेपाळने कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेखसह ३९५ चौरस किलोमीटरचा भारतीय भूभाग आपल्या नकाशात दाखवला आहे. याचबरोबर भारताने उत्तराखंडपासून ते चीनच्या सीमेपर्यंत बांधलेल्या नव्या ‘कैलास मानसरोवर लिंक’ रोडवर देखील नेपाळने आक्षेप घेतला होता. या सर्व प्रकारानंतर भारत आणि नेपाळमधील तणाव वाढला आहे.
Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.