चीनी कंपनीचे 1100 कोटींचे गँम्बलिंग रॕकेट उघड


हैदराबाद (वृत्तसंस्था) – चिनी नागरिकांनी स्थापन केलेल्या शेल कंपन्यांद्वारे केल्या जात असलेल्या मनी लॉण्डरिंगचे रॅकेट दोनच दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आले होते. आता हैदराबाद येथे चिनी गेमिंग कंपनीकडून चालविल्या जाणारे ऑनलाईन जुगाराचे रॅकेट नष्ट करण्यात आले. तब्ब्ल ११०० कोटी रुपयांचे बेकायदा व्यवहार समोर आले असून एका चिनी नागरिकांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मंगळवार आणि बुधवारी नवी दिल्ली, गुरूग्राम आणि नोएडामध्ये आयकर विभागाने मनी लॉंडरिग प्रकरणी चिनी कंपन्यांवर छापे टाकले होते. हाच तपास करीत असताना या बनावट ऑनलाईन जुगाराचा पर्दाफाश झाला आहे. ह्या ऑनलाईन जुगारातून होणारी उलाढाल ११०० कोटी रुपयांची होती, असा दावा पोलिसांनी केला. हैदराबाद पोलिसांनी तेलंगानाच्या गेमिंग अधिनियम आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि १२० बी अंतर्गत दिल्लीतून एका चीनी नागरिकासह तीनजणांना अटक केली आहे.
‘याह हाओ’ असे या चीनी नागरिकाचे नाव असून तो ‘लिंक्युएन’ ॲपचा हेड आहे. याचे तीन साथीदार धीरज सरकार, अंकित कपूर आणि नीरज तुली दिल्लीतील ई-वॉलेट कंपनी ‘डूकीपे’चे डायरेक्टर्स आहेत. ‘लिंक्युएन’ ॲप चीनच्या ऑनलाईन गॅम्बलिंग ‘बीजींग टी पॉवर कंपनी’ चे गेमिंग ॲप आहे.
या गेमिंग वेबसाईटचा सर्व्हर चीनमध्ये असून डेटा होस्टिंग सेवा ही सुद्धा चीनमधून संचालित केली जात होती. या ऑनलाईन जुगाराच्या व्यवहारात मिळालेली रक्कम विविध खात्यांमध्ये वळविण्यात आली आहे. यातील काही खाती परदेशातील आहेत. पोलिसांनी दोन खाती गोठवली आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.