चोपड्याच्या तरूणाला अवैध शस्रांसांसह अटक,4 लाख 30 हजारांचे शस्त्र जप्त

पुणे (वृत्त संस्था) दि-11 – जळगावहून पुण्यात अवैधपणे शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या उच्चशिक्षित तरूणासह चौघांना पुण्याच्या खंडणी विरोधी पथकाने आज अटक केलेली आहे. त्यांच्याकडून 8 देशी बनावटीचे पिस्तूल, 15 जिवंत काडतुसे असा 4 लाख 30 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामुळे शस्त्र तस्करीचे मोठे रॕकेट उघडकिस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भूषण महेश मराठे (वय 23, रा. चोपडा, जि. जळगाव) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्यासोबत राहुल चंद्रकांत पवार (वय 23, रा. नसरापूर, भोर जि.पुणे ), तौफिक गुलाब शेख (वय 25, रा. शिवाजीनगर ,पुणे) आणि राम गोरोबा जाधव (वय 25, रा. दांडेकर पूल,जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगारांची माहिती एकत्रित करण्यात येत होती. त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहिती वरून जळगावमधून एकजण पिस्तूलांची विक्री करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती पोलीस अमंलदार सचिन अहिवळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने स्टेशन परिसरात सापळा रचून भूषण मराठे नामक तरूणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 पिस्तूल आणि 6 जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली.
चौकशीत त्याने पुणे शहरासह ग्रामीण भागामध्ये पिस्तूलांची विक्री केल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला दिलेली आहे. त्यानुसार पथकाने राहुल पवार, तौफिक शेख, राम जाधव यांना अटक केले. त्यांच्याकडून 5 पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.
राहुल पवार सराईत गुन्हेगार असून राजगड पोलीस ठाण्यातंर्गत त्याच्याविरूद्ध 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर राम जाधव विरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी परराज्यातील टोळीकडून पिस्तूल पुरविण्यात येत आहे का, यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी माध्यमांना दिलेली आहे.