आरोग्य

जनतेच्या सहकार्याने कोरोनावर मात करू – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दिनांक 26 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट कायम असले तरी जनतेच्या सहकार्याने कोरोनावर आपण मात करू शकतो. त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

शहरातील पोलिस संचलन मैदानात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी जनतेला शुभेच्छा देतांना पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय्,महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक महानगपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेसह सर्व विभागांचे अधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून २६ जानेवारी हा दिवस आपण ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा करतो. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, नाशिकची दीडशे वर्ष, महाविकास आघाडी शासनाचे दोन वर्ष असा हा त्रिवार आनंदात साजरा होणारा 72 वा प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन साजरा करत आहोत, हे सांगतांना मनस्वी आनंद होत असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात दोन वेळचे अन्न उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 90 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. ही योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 49 लाख 57 हजार 435 गरीब व गरजू लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोविड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 36 कोटी 42 लाखांचे सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात आले असून कोविड-19 च्या काळात 0 ते 18 वयोगटातील दोन्ही पालक गमावलेल्या 23 बालकांना प्रत्येकी 5 लाख सानुग्रह अनुदान मुदत ठेवीच्या स्वरूपात देण्यात आले आहे. तसेच या बालकांना ‘बाल संगोपन योजनेंतर्गत प्रति महिना 1100 रुपये एवढा लाभ देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या बालकांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आत्तापर्यंत 3 लाख 13 हजार 59 रूपये फी संबंधीत शाळांना अदा करण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात तिसऱ्या लाटेच्या वेळी मालेगावकरांनी आपल्या प्रतिकार शक्तिच्या जोरावर कोरोनाला रोखून धरले आहे. याबाबतची शास्त्रीय कारणमीमांसा शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संशोधनाचे काम करीत आहेत, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नमूद केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबियांसाठी श्री. राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या उभारी उपक्रमासाठी तसेच ऑनलाईन ७/१२ आणि सेल्फ बिनशेती चलन वितरण कार्यप्रणालीचे कौतुक करण्यात आले. सेवा हमी कायद्यात सर्वाधिक 101 सेवांचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या या योजनेचा विस्तार राज्यभर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व यासाठी त्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेचा लोक प्रशासनातील नाविन्यपूर्ण कामगिरी साठीचा डॉ. गडकरी स्मृति पुरस्कार देखील प्रदान करण्यात आल्याने पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. तसेच बँकांमार्फत ही मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप झाल्याने त्यांच्या समस्या कमी होवून मागील वर्षांच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाषणात सांगितले.

शहर वाहतुकीचे सुनियोजन करून अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांची ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम संपूर्ण शहरात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. तसेच ‘नो फेक नोट ऑपरेशन राबवत बनावट चलनी नोटा बनवण्याचे दोन रॅकेट उध्वस्त करणे व ‘एक पोलीस-एक झाड’ असे पथदर्शी उपक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस यंत्रणा राबवित आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या ग्रामपंचायतीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेले ‘एक मुठ पोषण’ ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ ‘रानभाज्या महोत्सव’ हे उपक्रम प्रशंसनीय आहेत. त्याचप्रमाणे महानगपालिकेच्या वतीने स्मार्ट स्कुल अभियान हातात घेण्यात आले असून पर्यावरण संतुलनासोबतच कार्बन ऑडिट मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नमामी गोदा मोहिमेच्या माध्यमातून गोदावरी नदीच्या शुद्धीकरणाच्या मोहिमेसोबत साबरमती प्रकल्पाच्या धरतीवर नदी काठांचे व घाटांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात बिटको रुग्णालयात पद्युत्तर वैद्यकिय महाविद्यालय सुरू करून शहराची वैद्यकिय यंत्रणा अधिक बळकट करण्याचा मानस आहे. प्रदुषणमुक्त शहरासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्याची मोहिम नाशिक महानगरपालिकेने हाती घेतली असून इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी 106 ठिकाणी सर्व्हे केला असून लवकरच बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर त्याची सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहितीही पालकमंत्री छगन भजुबळ यांनी दिली आहे.मांजरपाडा प्रवाही वळण योजनेद्वारे पश्चिमेकडील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परंपरा अखंडीत ठेवण्यासाठी लोकहितवादी मंडळ नाशिक, मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या सहकार्य व शासन प्रशासनाच्या पाठींबामुळे साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पडले. तसेच जिल्ह्यातील संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर या कादबंरीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी श्री. वाघ यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्यातील जलतरणपटू स्वयंम पाटील याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. तसेच श्रीलंका येथे अर्धमॅरेथॅनमध्ये जिल्ह्यातील संजिवनी जाधव हिने सुवर्ण पदक मिळवून आंतराष्ट्रीय स्तरावर नाशिकचा झेडा उंचावला आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे. याबरोबरच ताई बामणे, कोमल जगदाळे,

अजय राठी, धिरज कुमार व आदेश यादव या खेळाडूंनी राष्ट्रीयस्तरावर मैदानी स्पर्धेत तर आदिवासी पाड्यावरील कौशल्या पवार, सरिता दिवा, वृषाली भोये, सुषमा चौधरी व ताई पवार या खेळाडू खो-खो सारख्या खेळात राष्ट्रीयस्तरावर सुवर्ण पदक प्राप्त करून नाशिक जिल्ह्याला क्रीडा क्षेत्रात एक नविन ओळख प्राप्त करून देण्याचे काम केले आहे. 2021 चे जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळविणारे ऐश्वर्या सुधारकर शिंदे, रविंद्र ज्ञानेश्वर कडाळे, गौरी सुनिल गर्जे, शदर भारस्कराव पाटील या खेळाडूंचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या राघोजी भांगरे व आद्य क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचे कार्य आणि देशासाठी दिलेले बलिदान लक्षात घेऊन इगतपुरी तालुक्यात सोनाशी येथे राघोजी भांगरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून त्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले असल्याचा उल्लेखही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात केला आहे.

कोरोनाच्या या संकट काळात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच महानगरपालिका आणि इतर सर्व यंत्रणा नियोजनबद्ध काम करीत आहे. कोरोनाच्या विषाणूचा नायनाट करण्यासाठी लसीकरण हा महत्वाच उपाय असल्याने नागरीकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेवून त्रिसुत्रीचे पालन करावे आणि जिल्ह्याला सर्वांगाने समृद्ध बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनतर जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेला नव्याने देण्यात आलेल्या चार वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.