राजकीय

पोलिसांनी तपास कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची अर्ध वार्षिक परिषद

मुंबई, दि. 11 :- जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक  परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पोलिस देशातील नावाजलेली संस्था आहे. आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा मोठी आहे. आता स्पर्धात्मक वातावरणास सामोरे जाण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. आपल्याला सर्वोत्तम रहावेच लागेल आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण पोलिसिंग केले आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी संस्थात्मक भाव (Institutional approach) आपल्या वागण्यात असला पाहिजे. उपलब्ध साधनसामग्रीचे योग्य व्यवस्थापन करून आता नवीन तंत्रज्ञान स्वीकारावेच लागेल. क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. मात्र बदलत्या काळानुसार यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर नवीन आणि वेगवान तंत्रज्ञान समाविष्ट करावे लागेल. प्रत्येक नवीन प्रकल्प कालबद्ध मर्यादेतच पूर्ण झाले पाहिजेत. यासाठी पूर्ण कार्यक्षमतेने अभियान स्तरावर यासंदर्भात काम करावे. विभागाने यासंदर्भात एकसंघपणे व समन्वयाने काम करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

संवादात्मक पद्धतीने कामकाजावर भर द्यावा

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वरिष्ठ अधिकारी आणि सर्वात खालची व्यक्ती यात अधिक संवाद असला पाहिजे. आपल्या कार्यालयाच्या बाहेरच्या जगाशी सुद्धा आपला उत्तम संपर्क असला पाहिजे. संवादात्मक पद्धतीने कामकाजावर भर द्यावा. कम्युनिटी पोलिसिंगचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम पुढे कायमस्वरूपी सुरू राहिले पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. गुन्हे आणि पोलिस कार्यपद्धती दोन्ही सातत्याने बदलत आहे. अशात पोलिस कार्यपद्धती बदलली नाही तर आपण मागे पडू. प्रशिक्षणावरही भर द्यावा लागेल. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध विषयांतील प्रशिक्षण घेतले पाहिजे. तीन वर्षांनी ही परिषद झाली. परिषदेत विविध विषयांवर अतिशय चांगले सादरीकरण झाले. येथील चर्चा येथेच थांबून उपयोग नाही तर त्याचे प्रतिबिंब शेवटच्या स्तरापर्यंत कसे जाईल, याचे नियोजन झाले पाहिजे. ज्यावर चर्चा झाली, त्यावर कृती आराखडा तयार झाला पाहिजे. त्याच्या अंमलबजावणीचा दर तीन महिन्यांनी महासंचालकांनी आढावा घ्यावा. परिषदेतील विविध विषयांवरील सादरीकरण व चर्चांमुळे अनेक विषयांवर विचारमंथन झाले.

            सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी हे उपयुक्त ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

            यावेळी क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम, कम्युनिटी पोलिसिंग, मानवी तस्करी, दहशतवाद प्रतिबंधन या विषयांवर सादरीकरण करण्यात आले.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button