जळगाव सिव्हिलमध्ये दुर्मिळ मत्स्यकन्येचा जन्म, पण अल्पायुषी


जळगाव – धरणगाव तालुक्यातील एका गावातील एका महिलेला शुक्रवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या महिलेला
प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ . संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली. प्रसूती होत असताच बाळाची घडण अत्यंत दुर्मीळ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यात बाळाचे दोन्ही पाय एकमेकांना जुडलेले असल्याने ते मत्स्यकन्येसारखे दिसून असल्याचे दिसून आले. तथापि, या अर्भकाला अनेक जन्मजात विकार असल्यामुळे अवघ्या 12 तासांमध्ये त्याने शेवटचा श्वास घेतला. दरम्यान, हे शिशू सिरोमोमेलिया या दुर्मीळ व्याधीने ग्रस्त असल्याने ते मत्स्यकन्ये सारखे दिसत असल्याची माहिती वैद्यकिय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे आणि शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरूण कसोटे यांनी दिली. तर वैद्यकिय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना याचे भविष्यात अध्ययन करता यावे म्हणून या बाळाच्या मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करून ते जतन करून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.