जिल्हाधिकारी आदेश

जिल्हाधिकारी व CEO यांची सातपुड्यातील आदिवासी गावांना भेट, ग्रामस्थांशी साधला संवाद

पाल ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रास भेट, वनपट्टयांचे केले वाटप तर घरकुलांची केली पाहणी
जळगाव, (जिमाका) दि. 30 – कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातपुड्यातील पाल, निमड्या, गारबर्डी, धरणपाडा या आदिवासी बहुल गावांना आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी संयुक्तरित्‍या भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.


            यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पाल, ता. रावेर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णालयातील रुग्णांना मिळणारे उपचार, आरोग्य सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधी आदिंची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांचेकडून जाणून घेतली. तर लसीकरण कक्षाची पाहणी करुन तेथील सोयीसुविधा, उपलब्ध लस, झालेले लसीकरण आदिंबाबतची माहिती मुख्य अधिपरिचारीका सौ. कल्पना नगरे यांचेकडून जाणून घेतली.  लसीकरण कक्ष आणि तेथील व्यवस्था बघून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


            भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता घ्यावयाची खबरदारी व काळजी याबाबत काही मार्गदर्शक सूचना देखील त्यांनी केल्यात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांच्या मदतीने ऑक्सिजन पाईपलाईन काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केली. ग्रामीण भागात लसीकरण वाढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी सर्व संबंधितांना केल्यात.
            आदिवासी बहुल भागातील जास्तीत जास्त नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे. तसेच त्यांच्यामध्ये लसीकरणाविषयी जागृती व्हावी याकरीता डॉ. बारेला यांनी स्थानिक बोलीभाषेत तयार केलेली व्हिडिओ क्लिप बघून जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी जिल्हाधिका-यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी. एन. पाटील, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, डॉ सचिन पाटील, डॉ स्वप्नीशा पाटील, डॉ मिलिंद जावळे यांच्यासह आरोग्य व महसुल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
            त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पालसह गारबर्डी, निमड्या, धरणपाडा आदि गावांना भेट देऊन तेथील पाहणी केली. गारबर्डी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आणि नरेगा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलांची पाहणी केली तसेच नरेगा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेचीही पाहणी केली. तर निमड्या, गारबर्डी ग्रुप ग्राम पंचायत अंतर्गत लाभार्थ्यांना वनपट्ट्यांचे आणि रेशनकार्डचे वाटपही जिल्हाधिकारी श्री. राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
धरणपाडा येथील ग्रामस्थांशी साधला संवाद
            सुकी धरणपाडा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. तेथील पात्र लाभार्थींना जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, सामाजिक अर्थ सहाय्य योजना यांचे अर्ज भरून घेऊन लाभ देण्याची प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. तसेच याठिकाणी गावठाण नसल्याने या ग्रामस्थांना सुविधा उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असल्याने वन विभाग आणि सिंचन विभागाने समन्वय साधून याठिकाणी गावठाण निर्माण करुन त्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी महसुल, वन विभाग, आदिवासी विकास विभाग, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.
            कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या गावातील नागरीकांना कोणत्याही प्रकारची अडचणी येवू नये याकरीता आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी संबंधित यंत्रणांना दिल्यात.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.