मुंबई

जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत – जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील

अलिबाग,दि.12 :- रायगड जिल्ह्यात मोठे 01, मध्यम 02, लघु 51 असे एकूण 54 जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाले आहेत, मात्र बांधकामाधीन 09 प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत. हे प्रकल्प वेगाने पूर्ण करावेत, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, सर्वश्री आमदार रविंद्र पाटील, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) सुषमा सातपुते, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, अलिबाग प्रांताधिकारी प्रशांत ढगे, जलसंपदा विभाग कोकण प्रदेश मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता ठाणे पाटबंधारे मंडळ श्री.धाकतोडे, अधीक्षक अभियंता उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ श्री.जाधव, कार्यकारी अभियंता हेटवणे मध्यम प्रकल्प विभाग संजीव जाधव, कार्यकारी अभियंता रायगड पाटबंधारे विभाग क्र.02 कोकण भवन श्रीमती राजभोज, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री.पाटील यांनी जिल्ह्यातील प्रामुख्याने काळ, अंबा, राजनाला, हेटवणे, सांबरकुंड, अंबोली, पाली-भूतावली, नागेश्वरी, कोथेरी, वडशेतवावे, काळवली-धारवली, कोंढाणे, पन्हाळघर, बाळगंगा, हरिहरेश्वर, मारळ आणि काळ-कुंभे या जलसिंचन प्रकल्पांच्या सद्य:स्थितीबाबत सविस्तर आढावा घेतला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नेमक्या काय अडचणी आहेत, अधिकचा निधी किती लागणार आहे, कोणत्या टप्प्यांवर कामे प्रलंबित आहेत, कोणकोणत्या प्रकल्पांसाठी उच्च पातळीवर तसेच शासन स्तरावर बैठक घेणे आवश्यक आहे, हे समजून घेऊन श्री.जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पांसंबंधीची प्रलंबित कामे त्वरेने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे तसेच संबंधित कार्यवाही पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहाय्य करण्यात येईल तसेच निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

बैठकीच्या सुरुवातीला अधीक्षक अभियंता ठाणे श्री.जाधव यांनी जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांच्या सद्य:स्थितीबाबत संगणकीय सादरीकरण केले. त्याचबरोबर काही प्रकल्पांना पूर्ण होण्यासाठी असलेल्या अडचणींबाबत मंत्री महोदयांना सविस्तर माहिती दिली.

 ‘सप्तसूत्री..कातकरी उत्थान अभियानाची’घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आदिवासी कातकरी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीकरिता “कातकरी उत्थान अभियान” सप्तसूत्री च्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या अभियानाविषयी माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाबाबत अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर मंत्री श्री.पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा प्रशासनाच्या कामाची प्रशंसा केली.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.