विज्ञान-तंत्रज्ञान

टेलिकम्युनीकेशन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील वैद्यकीय सेवेवर सकारात्मक परिणाम: डॉ.गिरीष कुळकर्णी

भुसावळ-सध्याच्या आधुनिक जगात स्मार्टफोन किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनीकेशन तंत्रज्ञाना शिवाय तसेच वायरलेस डिव्हाइसशिवाय आपल्याला जीवनाची कल्पना करणे सुद्धा कठीण आहे. २०२१ पर्यंत जगातील जवळपास प्रत्येक भागांमध्ये वायरलेस तंत्रज्ञान जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, ज्यामुळे आपल्या ग्रहाच्या अगदी दुर्गम भागातही प्रगतीचे वारे पोहोचले आहे. टेलिकम्युनीकेशन तंत्रज्ञानामुळे जगातील दुर्गम भागातील वैद्यकीय सेवेवर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला आहे. विशेषतः वैद्यकीय माहिती देवाण घेवाण आणि उपचारांच्या व मार्गदर्शनाच्या वितरणात सुधारणा होऊन टेलिमेडिसीन व टेलिकाउन्सीलींग हे आता अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सहाय्यक ठरत आहेत. स्मार्टफोन्ससारख्या वैयक्तिक डिजिटल सहाय्यक उपकरणे रुग्णांना मदत करण्यासाठी व वैद्यकीय डाटा वहनासाठी तसेच वैद्यकीय सेवा, रोग-उपचार मार्गदर्शक तत्त्वे आणि इतर माहिती तातडीने आवश्यक ठिकाणी पोहोचवून वैद्यकीय सेवेत वेगवान बदल घडवून आणले आहेत अशी माहिती डॉ.गिरीष कुळकर्णी यांनी दिली. जागतिक दूरसंचार दिनानिमित्त श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या वतीने आयोजित रेसेन्ट ट्रेंड्स अँड ऑपरच्युनीटीज इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.
आपत्ती व्यवस्थापनात मदत पोहचवणे सोपे
जगातील विविध भागांमध्ये आपत्तींची माहिती अलिकडच्या वर्षांत वायरलेस टेलिकम्युनीकेशन संवादाद्वारे भर्रकन जगाच्या एका कोपऱ्यातुन दुसरीकडे कळून लवकर मदत उभारता येते. सॅटेलाईट कम्युनीकेशनच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींचे नियोजन सुद्धा शक्य होत आहे. मोबाईल डिव्हाइसेसने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा इशारा देणे सोपे झाले आहे. आपत्तीनंतर, वायरलेस तंत्रज्ञानामुळे बचाव पथक आणि वाचलेले किंवा आपत्ती प्रभावित यांच्यात संवाद खूपच सुधारला आहे आणि लोकांना प्रभावित क्षेत्रातील प्रियजनांशी द्रुत संपर्क साधणे, मदत पोहचवणे अगदी सहज शक्य झाले आहे असेही डॉ.कुलकर्णी म्हणाले.
टेलिकॉम क्षेत्राला तरुणांची पसंती:
दूरसंचार क्रांती ही जगातील सर्वांत महत्त्वाची आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासाची क्रांती मानली जाते. आज भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान समृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे. या क्षेत्रातील सतत होणाऱ्या बऱ्याच विकासाचा परिणाम म्हणून अनेक तरुण चांगले करिअरचे स्वप्न घेऊन या क्षेत्रात पुढे येत आहेत. उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळवून अभियंते खाजगी आणि सरकारी क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे अशी माहिती प्रा.अनंत भिडे यांनी दिली.
कार्यशाळेत आजी माजी विद्यार्थ्यांसोबत प्रा.अनंत भिडे, प्रा.धिरज अग्रवाल, प्रा.सुलभा शिंदे, डॉ.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.दीपक खडसे, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक साकळे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.धिरज पाटील सहभागी झाले होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.