
ठाकरे सरकारविरोधात “अविश्वास” प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता ? एकनाथ शिंदे आमदारांसह नवसारी (सुरत) ला रवाना ? राज्यात सत्तांतराचे संकेत ?
राज्यसभा निवडणुकीत पाठोपाठ विधानसभा परिषद निवडणुकीत भाजपने दाखविलेला धक्कादायक करिष्मा यातून शिवसेना सावरत नाही, तोच शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री हे काही आमदारांसह गुजरातमधील सुरत येथील ली मेरिडियम हॉटेल मध्ये मुक्कामाला गेल्याची माहिती समोर आल्याने ठाकरे सरकार मध्ये प्रचंड खळबळ उडालेली असून ठाकरे सरकार आता कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकट वर्तीय आणी गुजरातमध्ये सुपर सीएम अशी ओळख असणारे चाणाक्ष मराठी नेते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मूळचे जळगाव जिल्ह्यातील सुसरीचे रहिवासी असलेले खासदार सी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे ,अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहाही आमदारांना सोबत घेऊन तसेच दुसरे मंत्री संदिपान भुमरे हे देखील काही आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांच्या सोबतीने सुरत येथे दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने आता ठाकरे सरकार संकटात सापडल्याची चर्चा सुरू झालेली आहे.यामुळे राज्यात सत्तांतर राहण्याचे संकेत दिसून येत असून याबाबत भाजपच्या थेट केंद्रीय स्तरावरून राज्यातील शिवसेनेतील नाराजांना सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असून येत्या काही दिवसात अनेक मोठ्या उलथापालथ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आता फेसबुक वर” योग म्हणजेच संतुलित मन सुखी निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग “असल्याची पोस्ट केलेली आहे. कालच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालावरून शिवसेनेचे तीन आमदार तसेच शिवसेना समर्थक आठ अपक्ष आमदार कुठल्या ची माहिती आकड्यांवरून स्पष्ट दिसत होती. त्यामुळे आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदार व खासदार यांची आज मुंबईत बैठक बोलावली होती. मात्र काही मंत्री हे आमदारांसह गुजरात मधील सुरत येथे रात्रीच निघून गेल्याची माहिती समोर आल्याने ठाकरे सरकारमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.यामुळे राज्यातील ठाकरे सरकारमध्ये धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे.
12 वाजता शिंदें पत्रकार परिषद घेणार
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 12:00 पत्रकार परिषद घेणार असून त्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. राज्यसभा निवडणूकीत संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेची उमेद्वारी देण्यासाठी एकनाथ शिंदे हे आग्रही होते.मात्र उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांना उमेद्वारी दिल्यापासून एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज होते.अशी माहिती आता समोर आलेली आहे.शिंदे यांच्या पत्रकार परीषदेतील भूमिकेनंतरच काही गोष्टी स्पष्ट होणार असून ठाकरे सरकारला धोका आहे का ? नाही हे स्पष्ट होणार आहे. तसेच किती आमदार त्यांच्या सोबत आहे हे सुद्धा आता पत्रकार परिषदेनंतरच स्पष्ट होणार आहे. ते नेमके काय बोलतात याकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांसह जनतेचे लक्ष लागून आहे. मात्र या अचानक रात्रीतून घडलेल्या घडामोडींमुळे शिवसेनेच्या गोटात प्रचंड धाकधूक व अस्वस्थता दिसून येत आहे.