पुणेवृत्तविशेष

तृतीयपंथीयांना आता पिंपरी-चिंचवड महापालिका देणार नोकरी, ऐतिहासिक निर्णय

पुणे दि-18(पिंपरी-चिंचवड) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आज अत्यंत प्रेरणादायी आणी ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे.समाजातील दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथी घटकाला स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आता महापालिका विविध पदांवर रोजगार उपलब्ध करून देणार आहे. या निर्णयामुळे समाजामध्ये दुर्लक्षित असलेल्या घटकाला समाजात एक वेगळे स्थान मिळण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय घेणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका देशातील पहिली महापालिका ठरलेली आहे.

महापालिका आयुक्तांची विविध योजनांना मंजुरी
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी नुकतीच विविध योजनांना मंजुरी देऊन त्या योजना जाहीर केल्या. या योजनेमुळे तृतीयपंथी घटकांना विविध ठिकाणी नोकरी आणि सवलती मिळण्यास मदत होणार आहे. त्यात ग्रीन मार्शल पथकामध्ये नेमणूक देण्याचा, वायसीएम रुग्णालयात या घटकांसाठी स्वतंत्र बेड आरक्षित ठेवण्याचा आणि महापालिकांच्या काही उद्यानांच्या देखभालीचे काम देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेचा शहरातील जवळपास 2000 पेक्षा अधिक तृतीय पंथीयांना फायदा होणार आहे.
तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना
तसेच तृतीयपंथीयांसाठी संजय गांधी पेन्शन योजना व त्यांच्या बचत गटांना अर्थसहाय्य अशा नाविन्यपूर्ण योजना सुरु केलेल्या आहेत. महापालिकेने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलून उपेक्षित घटकांना समतेची वागणूक आणि त्यांचे न्याय हक्क अधिकार देण्याचे स्तुत्य काम केले आहे, असेही आयुक्तांनी माध्यमांना सांगितले. यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील रामा तृतीयपंथी, दक्षता सामाजिक संस्था, रयत विद्यार्थी विचार मंच आदी संघटनांनी आयुक्त राजेश पाटील यांचे आभार मानले आहेत.
संविधानाची खरी अंमलबजावणी
भारतीय संविधानाद्वारे आपला भारत देश समता, न्याय, बंधुता या तत्वावर चालतो. पण आम्ही तृतीय पंथी समता, न्याय, बंधुता यापासून नेहमीच वंचित राहिलो.तृतीयपंथी यांच्या पदरी नेहमी उपेक्षा, अपमान, दारिद्र्य हेच आले. भारतीय संविधानाने आम्हाला माणूस म्हणून स्वीकारले आमचे हक्क अधिकार मान्य केले. परंतु, समाजात मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. देश स्वतंत्र होऊन एवढी वर्षे झाली तरी यांना आजही माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळावी यासाठी लढा द्यावा लागतो. पण चांगल्या गोष्टी देखील आमच्या बद्दल घडतात याचा प्रत्यय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धाडसी ऐतिहासिक निर्णयांमुळे आला आहे.
महापालिकेने दुर्लक्षित तृतीयपंथी घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी न्यायाची भूमिका घेत सामाजिक क्रांतीचे निर्णय घेतले आहेत.तृतीयपंथी यांना समाजात सन्मान मिळावा याकरिता महापालिकेने आदर्श पाऊल उचलले आहे. महापालिकेचा हा एक ऐतिहासिक निर्णय केवळ पिंपरी चिंचवड शहरापुरता मर्यादित राहणार नसून भविष्यात देशातील सर्व तृतीयपंथीयांना समाजात न्याय आणि प्रतिष्ठा लाभेल यासाठी ही नांदी ठरण्याची शक्यता आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.