आरोग्य

देवसाने-मांजरपाडा प्रकल्पामुळे चांदवड व येवला तालुक्यांना जलसंजीवनी; चांदवडमधील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध – पालकमंत्री छगन भुजबळ

महासंवाद

नाशिक दि. 30 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) दुष्काळाच्या खाईत खितपत पडलेल्या चांदवड तालुक्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने देवसाने (मांजरपाडा) अभिनव प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे. या भागाला अधिकचे पाणी मिळण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण पुणेगाव दरसवाडी मार्गे येवल्यासोबतच चांदवडमध्ये देऊन हा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ते आज चांदवड येथे पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार डॉ.राहुल आहेर, उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे, शोभा कडाळे, पंचायत समिती सभापती पुष्पा धाकराव, उपसभापती शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य नितीन आहेर, ज्योती भवर, अमोल भालेराव, डॉ.नितीन गांगुर्डे, निर्मला आहेर, ज्योती आहेर,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे,गटविकास अधिकारी महेश पाटील  यांच्यासह पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पाद्वारे पुणेगाव दरसवाडी कालव्यातून चांदवड तालुक्यातील पाझर तलाव भरले जातील. गुजरातकडे वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी आपण पार गोदावरी प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात वळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यातून नाशिक जिल्ह्यासोबतच मराठवाड्याची तहान भागविली जाईल. आज पंचायत समितीची सुसज्य इमारत उभी करण्यात आलेली आहे. या माध्यमातून पंचायत समितीचे कामकाज करण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील. जिल्ह्यात आपण विविध सूसज्य पंचायत समिती इमारत बांधण्यात आलेल्या आहेत. तसेच येवल्यात मंत्रालयाच्या धर्तीवर सर्व कार्यालय एका ठिकाणी आणून आपण प्रशासकीय संकुल उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चांदवडला या नवीन इमारती बांधण्यासोबतच त्यांना लागणार आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, कुठलीही इमारत उभी करत असतांना सर्व आवश्यक बाबींचा समावेश करून प्रस्ताव सादर करण्यात यावे त्यातून परिपूर्ण कामे करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे त्यांनी सांगितले. यामध्ये चांदवड मधील ६३ किलोमीटर आणि येवल्यातील ८८ किलोमीटर अंतरादरम्यान येणाऱ्या अनेक गावांना या देवसाने प्रकल्पाचा फायदा होणार आहे. हा प्रकल्प येवला व चांदवड तालुक्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरणार आहे. पुणेगाव किमी २६ ते ६३ कालव्याची गळतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.हथीयाड -राजदेरवाडी लघु पाटबंधारे योजना प्रस्ताव, काळडोह -केंद्राई धरणाच्या लगत नारायणगाव शिवारात स्थानिक नाल्याच्या सोर्स यास मंजुरी, परसूल ते गंगावे पुणेगाव कालव्याची पाटचारी काढणे, ओझरखेड कालवा- वाहेगावसाळ गोई नदीपासून ते काजळीनदी पर्यंत वाढविणे यासोबतच चांदवड तालुक्यातील इतरही सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहे. काही नव्याने मंजूर करावयाचे आहे. त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करून येथील सर्व योजनांची कामे मार्ग लावण्यास आपण कटीबद्ध आहोत, असे सांगताना ते पुढे म्हणाले, गेली दोन वर्षे अर्थचक्र थांबल असलं तरी माणसे वाचविण्यासाठी आपण जास्तीत जास्त निधी देण्यास प्राधान्य दिले.आता कामकाजास सुरुवात झाली असून विकासाची कामे जलद गतीने करण्यात येतील.

कोरोनाचा सामना करत असतांना विकास कामे करणे या दोन्हींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करून राज्याचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येत आहेत.दोन वर्षांचा बॅकलॉग मोठा आहे तो भरून काढण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.लोकांना आनंद वाटेल असे निर्णय या इमारतीतून घेतले जावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या वतीने पंचायत समितीस आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच शासन स्तरावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अधिक विकासाची कामे केली जातील. कोरोनाच्या काळात जरी कामे होण्यास अडचण आली असली तरी मंत्री छगन भुजबळ यांनी निधीची कुठलीही कमतरता पडू दिली नाही. यापुढील काळातही आवश्यक निधी उपलब्ध होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार डॉ.राहुल आहेर म्हणाले की, पंचायत समितीची इमारत पूर्ण झाली असून इतर कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. तसेच शासकीय इमारती तयार करत असतांना यामध्ये फर्निचर सह इतर अनुषंगिक कामे करण्यास निधी उपलब्ध व्हावा अशी सूचना त्यांनी यावेळी मांडली.

यावेळी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरांजली अर्पण करत अभिवादन केले.

Team DGIPR

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.