क्राईम

देवी-देवतांच्या नावाने यंत्र-तंत्र विक्रीच्या जाहिराती दाखविणाऱ्या चॕनल्सवर गुन्हे दाखल करा-हाय कोर्ट

मुंबई दि 06- टीव्ही चॅनल्स आणि विविध प्रसार माध्यमांवर देवी-देवतांच्या नावाने यंत्र, तंत्र विक्री करण्याची जाहिरात दाखविण्यावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांनी मंगळवारी (५ जानेवारी) दिले. अशा प्रकारच्या यंत्राची विक्री, उत्पादन, प्रसार व प्रसार करणाऱ्यांवर अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३ ( अघोरी प्रॅक्टीस अॅण्ड ब्लॅक मॅजिक अॅक्ट २०१३ ) नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. केंद्र व राज्याने तीस दिवसांत अशा प्रकारांवर कारवाई करण्यासाठी काय पावले उचलली, यासंबंधी एका महिन्यात औरंगाबाद खंडपीठाला अवगत करावे असेही आदेशात नमूद केलेले आहे. विविध प्रसार माध्यमांवर धर्माच्या नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र आदी वस्तू विकण्याच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखविल्या जात होत्या. सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते. राज्यशासनाच्या २०१३मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसार माध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. या प्रकार विरुद्ध २०१५ मध्ये औरंगाबाद येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे (रा. टाऊनसेंटर, सिडको, औरंगाबाद) यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. समाजात विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होऊन वैज्ञानिक वातावरणास गती मिळावी. अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे यासाठी संबंधित २०१३ चा कायदा निर्माण केला. प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या समवेत अशा बाबींवर प्रतिबंध घालण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला आहे. कायद्याच्या माध्यमातून भोंदूगिरीला वेसण घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. संबंधित याचिकाकर्ते अंभोरे यांनी याचिका नंतर मागे घेण्याची विनंती खंडपीठास केली होती. खंडपीठाने याचिका समाजासाठी महत्त्वाची असल्याने पुढे चालू ठेवली. न्यायालयाचे मित्र म्हणून बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ विजयकुमार सपकाळ यांची नियुक्ती केली. राज्य शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील महेंद्र नेर्लीकर यांनी तर केंद्राच्या वतीने डी. जी. नागोडे यांनी काम पाहिले. यंत्र बनविणाऱ्या प्रतिवादी कंपनीतर्फे अॅड. सचिन सारडा हजर झाले होते. यामुळे अशा जाहिराती दाखविणाऱ्या टिव्हि चॕनल्स व इतर प्रसार माध्यमांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.