मुंबई

देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा मुंबई ते बेलापूरचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे, दि.१७ (जिमाका): देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणेदरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बेलापूर जेट्टी आणि बेलापूर मुंबई वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री श्री. ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्गमंत्री  सर्बानंद सोनोवाल दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार,  खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, मंदा म्हात्रे,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,   मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी,  ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांच्यासह  वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा असून देशातील पहिली वॉटर टॅक्सी महाराष्ट्रात सुरु होत आहे. मुंबईतून सुरू झालेल्या सेवेचे अनुकरण देशभर केले जाते हे मुंबई ठाणे दरम्यानच्या पहिल्या रेल्वेसेवेरून दिसून आले आहे.  जलवाहतुकीच्या या सेवेचेदेखील देशात अनुकरण केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग जनसेवेसाठी

छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर हुकूमत असली  पाहिजे या भावनेने त्याकाळात कल्याणमध्ये आरमाराची बांधणी सुरु केली तेव्हापासूनच या परिसराचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यानंतर इंग्रजांनी रेल्वे आणली. आपल्याकडील साधनसंपत्तीचे महत्त्व आपण किती ओळखतो आणि त्याचा जनतेला किती उपयोग करून देतो  याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर

विकासात दळणवळणाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, भुयारी रेल्वे यामध्ये आधुनिकीकरणाची कास धरत आज वॉटर टॅक्सी सुरु झाली. नवी मुंबईला मुंबईशी आणि एलिफंटा लेण्यांना जोडणारी ही जलवाहतूक सेवा सामान्य नागरिकांना फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले.

समुद्र हा केवळ पाहण्यासाठी नसून त्याचा उपयोग जलवाहतुकीसारख्या प्रकल्पांसाठी वाढला पाहिजे. येत्या दोन तीन वर्षात समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणार असून हा क्रांतिकारक टप्पा असेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई परिसरात परिवहनाचे जाळे विकसित

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबईतील ५५ उड्डाणपूल, सागरी किनारा मार्ग, मुंबई- कोकणाला जोडणारा  सागरी मार्ग, शिवडी न्हावा शेवा मार्ग असे परिवहनाचे जाळे विकसित केले  आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, ती जगाशी हवाई मार्गाने जोडली. पण मुंबई महानगर परिसराला जोडणारी जलवाहतूक सेवा महत्वाची आहे, कामासाठी, उद्योग व्यवसायासाठी मुंबई येणाऱ्या सर्वसामान्य माणसाला ही सेवा अधिक उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून महाराष्ट्रात १३१ प्रकल्प- केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल

केंद्रीय मंत्री श्री सोनोवाल म्हणाले,   सागर किनारपट्टी जिल्ह्यात सागरमाला प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे.  यातून सागरतटीय जिल्ह्यातील लोकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्नआहे. यातून रोजगार निर्मिती करून आर्थिक विकासाचे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.कोरोना काळातही बेलापूर जेट्टीचे काम सुरु राहिले. नवी मुंबई ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या या जलवाहतूक सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होईल. आणखी काही जे्ट्टी मुंबई हार्बर भागात प्रस्तावित आहेत.

मुंबई ते अलिबाग रो रो सेवा सुरु झाली आहे. वॉटर टॅक्सीला मिळणारा प्रतिसाद पाहून जलवाहतूकीसाठी अतिरिक्त जेट्टीचे बांधकाम केले जाईल. केंद्रीय नौवहन मंत्रालयाकडून बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, जेट्टीचे निर्माण, कौशल्य विकास अशा विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. सागरमाला कार्यक्रमातून  जलद आर्थिक विकासाला चालना देण्यात येत आहे. १.०५ लाख कोटीचे १३१ प्रकल्प महाराष्ट्रासाठी निश्चित करण्यात आले आहेत.  यात सागरमाला कार्यक्रमांतर्गत ४६ प्रकल्पास २७८ कोटीचे वित्तीय सहाय्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बांधवांच्या सक्षमीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे सांगतांना त्यांनी ससून डॉकसह सिंधुदुर्ग आणि रायगडच्या बंदरांच्या आधुनिकीकरणासाठी काम सुरु असल्याचेही ते म्हणाले.

कोरोना संकटातही विकास कामांना गती- उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,   मुंबई महानगरच्या परिवहन सेवेच्या विकासासाठी शासन मागील दोन वर्षांपासून काम करत आहे. चक्रीवादळ, अतिवृष्टीसारखं नैसर्गिक संकट आलं, कोरोना सारखं संकट आलं, पण या अडचणीतून विकास कामांना गती देण्याचं काम शासनाने केले. मेट्रो , मोनो नंतर जलवाहतूक प्रकल्प आज सुरु होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगडकरांसाठी आजचा दिवस अभिमानाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

गेट वे ऑफ इंडियाजवळ केंद्र शासनाच्या तर्फे आणखी एक प्रकल्प प्रस्तावित आहे. तो लवकर सुरु व्हावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू या असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केले.

जलवाहतुकीमुळे नवी मुंबईठाणेकरांना लाभ

जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे, नवी मुंबईकरांना याचा लाभ होईल. यामध्ये पर्यावरणाचाही विचार आहे. सर्व मिळून या कामांना गती देऊ या. आज चार मार्गावर जल टॅक्सी सेवा सुरु होत आहे. प्रवाशांचा वेळ, पैसा श्रम तर यामुळे वाचेलच परंतू प्रदुषणालाही आळा बसेल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.

एमएमआरक्षेत्राला लागून खाडी आहे त्यामुळे जलवाहतूकीला चालना देऊन या सुविधेचा लाभ घेता आला पाहिजे. सुरक्षित प्रवासाला चालना देत ही जलवाहतूक सेवा सुरु केली तर प्रवाशांनाही सुलभ सुविधा उपलब्ध होईल. पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतो असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी  सगळे मिळून काम करू असे आवाहन ही त्यांनी केले. मेट्रो चे काम पूर्ण झाले, जलवाहतूक सुरु झाली तर एमएमआरचे रुप एकदम पालटलेले दिसेल असेही ते म्हणाले.

जलवाहतुकीमुळे रस्ते वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत- मंत्री एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले,  केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील वाहतूकीस आज या वॉटर टॅक्सीच्या माध्यमातून चालना देण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबईकरांना जलवाहतूक सेवा उपलब्ध झाली तर रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. ठाणे- मुंबई सेवाही लवकरच सुरु होईल. एमएमआरक्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम एमएमआरडीए, सिडकोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सागरमाला कार्यक्रमातून केंद्र आणि राज्याच्या  ५०:५० टक्क्यांच्या सहभागातून बंदर विकासाच्या कामाला गती दिल्याचे ते म्हणाले.

नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर,  अशा विविध ठिकाणाहून जलवाहतूक सुरु झाल्यास प्रवाशांना उत्तम परिवहन सेवा उपलब्ध होईल. काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना मार्गी लावल्याबद्दल केंद्रीय नौवहन मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले.

१६ लाख लोकांना जलवाहतुकीची सेवा- मंत्री अस्लम शेख

बंदरे विकास मंत्री श्री. शेख म्हणाले,  कोरोनाकाळातही वर्षानुवर्षे रखडलेली कामे एकेक करून पूर्ण करत आहोत. जलवाहतूकीची  ही सेवा  आज १६ लाख लोकांना उपलब्ध करून देत असलो तरी ही सेवा अधिक व्यापक करण्याची गरज आहे.  नॅशनल वॉटर वेजचे, जेट्टी बांधण्याचे काही  प्रस्ताव मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत. त्यास मान्यता मिळाली तर वाहतूक कोंडी फोडण्यास नक्कीच मदत होईल.

जलवाहतूकीमध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य ठरेल असा विश्वास व्यक्त करतानाच  महाराष्ट्रात जलवाहतुकीच्या प्रकल्पांना चालना देण्याची गरज आहे, असेही श्री. शेख यावेळी म्हणाले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.