धरणगाव,एरंडोल, पारोळा तालुक्यात 5 दिवसांचा जनता कर्फ्यु घोषीत

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 – एरंडोल, पारोळा आणि धरणगाव तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल, पारोळा, धरणगाव तालुका क्षेत्रात 23 मार्च 2021 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून 27 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील. केवळ पुजारी दैनंदिन पुजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, तथापि घरपोच सुविधा आणि पार्सल सुविधा सुरू राहील.
सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडास्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.
दुध विक्री केंद्र, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका सेवा, मेडीकल दुकाने, वृत्तपत्र सेवा, मिडीया सेवा, कुरिअर, पेट्रोलपंप, ( अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी ) रुग्णाला ने-आण करणारी रिक्षा सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज, शासकीय कार्यालये ( 50% उपस्थितीत), पूर्वीचे नियोजीत परिक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरु राहतील. आंतरराज्य व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक ( जसे एस.टी. महामंडळ, पोस्ट विभागाचे वाहने) सुरु राहील. रेल्वे, विमान, बस सेवा सुरु राहतील. नगरपरिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत घटक यांना सुट देण्यात आली आहे. तसेच इतर शासकीय आस्थापनांना ( उदा. कृषिविभाग, महावितरण, टेलिफोन) घरपोच सेवा, सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुनच नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसिल कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहील.
एरंडोल, पारोळा, धरणगाव या तालुका क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या निर्बधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रीया संहिता,1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.