राजकीय
Trending

विधानपरिषदेवर इच्छुकांचा डोळा; आमदारकीच्या 12+6 जागांसाठी शिंदे गट-भाजप व राष्ट्रवादीत जोरदार लॉबिंग

मुंबई : मागील वर्षांपासून विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना,भाजप आणी आता सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात आज जोरदार लॉबिंग सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता नवीन सदस्यांची लवकरच निवड केली जाणार आहे. गेल्याच वर्षांत कार्यकाळ संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांनंतर विधानपरिषदेवरील आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. रिक्त झालेल्या सहा जागांपैकी काँग्रेस आणि भाजपकडे प्रत्येकी दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडे प्रत्येकी एक जागा आहे.
पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता धूसर आहे.शिंदे-फडणवीस-पवार सरकार महामंडळांवर नियुक्त्याही करत नसल्यामुळे शिंदे गटात विधानपरिषदेत उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. गेल्या वर्षभरापूर्वी जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पडद्याआड व्यूहरचना करत दहापैकी पाच जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादीला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती.त्यानंतर आतापर्यंत शिंदे गटात अनेक ज्येष्ठ नेते सामील झाले आहेत, आपल्याला विधानपरिषद किंवा किमान राज्यशासित महामंडळांपैकी सर्वोच्च स्थान मिळावे, अशी त्यांची इच्छा आहे. परंतु आता महामंडळांवरील नियुक्त्या रखडल्याने सर्वच शिंदे-फडणवीस-पवार गटाकडून काही जण विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग करत असल्याची माहिती समोर आज समोर आलेली आहे.
शिंदे गटात प्रवक्तेपदी वर्णी लागलेले किमान तीन ते चार नेते आहेत, ज्यांचा विधान परिषदेवर डोळा आहे.आजच्या बैठकीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे, राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाल्याने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिंदे गट-भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करून या जागा ताब्यात घेण्यासाठी आज दिवसभर मोठी खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे.
यांचा कार्यकाळ संपलाय
राष्ट्रवादीचे अनिल भोसले (पुणे), काँग्रेसचे मोहन कदम (सांगली-सातारा) आणि अमरनाथ राजूरकर (नांदेड), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) आणि भाजपचे चंदूभाई पटेल (जळगाव) आणि परिणय फुके (भंडारा गोंदिया) यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ ५ डिसेंबर रोजी संपला. याशिवाय ठाणे-पालघर, अहमदनगर आणि सोलापूर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणखी तीन जागाही रिक्त आहेत.

12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

प्रचंड गाजलेल्या राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवरील 12 रिक्त जागांसंदर्भात कोणतीही पावले उचलू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात देत शिंदे गटाला झटका दिला होता.आज सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या नियुक्तीला विरोध करणारी याचिका मागे घेण्याची परवानगी दिल्याने तांत्रिकदृष्ट्या 12 आमदारांची नियुक्ती करण्यात कोणताही अडथळा नाही. मात्र, त्यासाठी नवी याचिका दाखल होण्याच्या आत राज्य सरकार जलद हालचाली करुन 12 आमदारांची नियुक्ती करणार का, हे पाहावे लागेल. कारण या जागांसाठी सुद्धा आता मोठी फिल्डिंग लावण्यात येत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारसाठी या 12 जागा आणि सहा नवीन रिक्त पदं ही विधानपरिषद सभापतींच्या निवडणुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण आहेत. रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त आहे. सध्या, शिंदे-फडणवीस युती विधान परिषदेत अल्पमतात आहे, जर 12 राज्यपाल नामनिर्देशित आणि 6 नवीन सदस्य पदरात पडले, तर सभापती पदासाठी त्यांच्या उमेदवाराला सहज विजय मिळू शकेल. 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक होणार आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button