नवजात बाळाला काटेरी झुडपात फेकून मातेचे पलायन
जामनेर- दि- 07/09/2020 नुकत्याच जन्मलेल्या बाळाला काटेरी झुडुपात टाकून मातेने पलायन केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा या गाव परिसरात उघडकीस आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यतील जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा या गावाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जवळ लहान बाळाचा रडण्याचा आवाज महिलांना आला होता,या आवाजाच्या दिशेने शोध घेतला असता काटेरी झुडपात नवजात पुरुष जातीचे अर्भक या ठिकाणी आढळून आलेले आहे,अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मलेले असावे आणि त्यातूनच बाळ टाकून देऊन मातेने पलायन केले असल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थ करीत आहेत. ही घटना वेळीच लक्षात आल्याने बाळाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले असून त्याच्यावर जामनेर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.नवजात बाळाला टाकून देऊन पलायन करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.पुढील तपास श्री प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक जामनेर पोलिस ठाणे हे करीत आहे.