जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
Trending

एकनाथराव खडसेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाचे वेध ! आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकीच्या रिंगणात उतरणार ?

एकनाथ खडसेंचा भूकंप अनेकांचे राजकारण संपवणार

मुंबई, दिनांक 6 एप्रिल, Eknathkhadse | गेल्या आठवड्यात दिल्ली दरबारी गेलेले आमदार एकनाथराव खडसे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त चर्चेत होते. मात्र खडसेंनी त्या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचे माध्यमांना सांगितले होते. मात्र आज भाजपाच्या स्थापना दिनी त्यांनी ते भाजपात घरवापसी करणार असल्याचे माध्यमांना कळविलेले आहे. लवकरच त्यांचा 8 एप्रिल रोजी चंद्रपूर नाहीतर 14 एप्रिल रोजी नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरींच्या उपस्थितीत भाजपात शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे.


एकनाथराव खडसे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विधानपरिषद परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र त्यांचे राज्यातील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,जळगाव जिल्ह्यातील नेते मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात मागील वर्षी टोकाची भूमिका घेतलेली असून कट्टर राजकीय वैर आहे.असे असले तरी त्यामुळे भाजपात येण्यासाठी खडसेंच्या मार्गात असलेले काटे दूर करण्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना यश आलेले आहे. त्यांनी दिल्लीत तीन ते चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत खडसेंची बैठक घेऊन सविस्तर सकारात्मक चर्चा करून एकनाथ खडसेंची घरवापसी केलेली आहे.

रक्षा खडसेंची उमेदवारी कापणार ?
विनोद तावडे यांनी एकनाथराव खडसे यांना रावेर लोकसभा लढविण्यासाठी तयार केलेले असून त्यांच्या पक्षप्रवेशानंतर रक्षा खडसेंच्या ऐवजी एकनाथराव खडसेंना रावेर लोकसभेचे भाजपाचे तिकीट मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. खडसेंना मानणारा मोठा वर्ग रावेर मतदारसंघात असल्याने त्यांचे निवडणुकीतील विजयाचे पारडे जड वाटत आहे. त्यासाठी खडसेंना आधी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाशी खडसेंचे विड्या-भोपळ्याचे नाते असल्याने त्यांना राज्यातील राजकारणात सक्रिय न ठेवता निवडून आल्यानंतर भाजपची सत्ता आल्यास त्यांचे राष्ट्रीय राजकारणात पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. केंद्रात खडसेंना थेट राष्ट्रीय राजकारणात आणून कॅबिनेट मंत्री बनवणार असल्याची योजना दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आखलेली आहे.
डॉ उल्हास पाटलांची कोंडी ?
तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी त्यांची कन्या डॉ केतकी पाटील यांच्यासह भाजपात प्रवेश केलेला होता. त्यावेळी त्यांना भाजपाची रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत होती. मात्र आता रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे. अशातच आता राष्ट्रवादीतून एकनाथराव खडसेंची भाजपात घरवापसी झाल्याने डॉ उल्हास पाटील आणि त्यांची कन्या केतकी पाटील यांची कोंडी होऊन उमेदवारीचा हिरमोड झालेला असू शकतो. ते आता काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. तसेच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले आणखी एक नाव म्हणजे भाजपचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे आता भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याची खात्री झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आलेली आहे. एकनाथ खडसेंच्या भाजपातील ‘ऐंट्रीने’ जळगाव जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालेले असून येणाऱ्या काळात आता रोज सकाळ संध्याकाळ अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडताना दिसून येणार आहे. एक मात्र नक्की की भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारलेले दिसून येत आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button