नाशकात बिबट्याचा धुमाकूळ,अखेर वनविभागाने केले जेरबंद

नाशिक :-आज सोमवारी (३१ जानेवारी) बिबट्याने शहरातील नाशिक रोड परिसरातील नागरी वस्तीत घुसून तब्बल ७ तास लपंडाव केला. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. अखेर वनविभागाने शर्तीचे प्रयत्न करत या बिबट्याला जेरबंद केले आहे. हा बिबट्या सकाळी ७ वाजता जय भवानी रोडवर पाहायला मिळाला. त्यानंतर त्याचा नागरी वसाहतीत वावर होता. अखेर गायकवाड निवास येथे एका कारखाली असताना वनविभागाने त्याला बेशुद्ध करत पकडलं.
नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास एक बिबट्या नाशिक रोड भागातील जय भवानी रोड परिसरात दिसला. आधी एका इमारतीत दिसलेला हा बिबट्या नंतर एका बगीचात आणि काही इमारतींच्या समोरही नागरीकांना दिसला होता. बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर वनविभाग घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी बिबट्याचा शोध घेतला, पण बिबट्या न सापडल्याने तो शेजारी असलेल्या जंगलात गेल्याचं बोललं गेलं. मात्र, काही वेळातच हा बिबट्या पुन्हा नागरी वसाहतीत दिसला. त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं गेलं.
तब्बल सहा तास लपंडाव खेळल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला गायकवाड निवासमधील एका कारखाली जाळ्यात पकडलं. बिबट्या पळून जाऊ नये म्हणून वनविभागाने संपूर्ण कार जाळ्याने घेरली. त्यानंतर बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देऊन बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.
दरम्यान, वनविभाग बिबट्याला पकडत असताना काही उत्साही नागरिकांमुळे अनेक अडचणीही आल्या. सेल्फी किंवा फोटो काढण्याच्या अट्टाहासामुळे वनविभागाला बिबट्या पकडताना अडचणी आल्या. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत अशा उत्साही नागरिकांना घटनास्थळापासून दूर हाकलून दिले.