आरोग्य

नाशिकला पर्यटन जिल्हा बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न; साहसी, धार्मिक व आरोग्य पर्यटनाच्या विकासाबाबत लवकरच बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नाशिक, दि.28 जानेवारी,2022 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकारचे पर्यटन क्षेत्र आहेत. देशातील व राज्यातील लोकांना धार्मिक पर्यटन सोबत इतर पर्यटनाची माहिती होण्यासाठी नाशिकला पर्यटन जिल्हा बनवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार, तसेच साहसी, धार्मिक व आरोग्य पर्यटनाच्या विकासाबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

बोट क्लब येथे आयोजित नाशिक जिह्याची पर्यटन विषयक आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक मिलिंद बोरीकर, पर्यटन संचालनालय नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटन विषयक माहिती दिली. यामध्ये कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, इको टुरीझम, वायनरी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक इत्यादी विषयी माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील शाश्वत व पुरक विकासासाठीची शक्तीस्थळे, जिल्ह्यातील पर्यटनासाठीचे संभाव्यक्षेत्रांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पुढिल आठवड्यात साहसी, धार्मिक व आरोग्य या तीन टप्प्यातील पर्यटनाचा विकासाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात येईल. तसेच पर्यटन विषयक प्रलंबित प्रकल्प लवकरत लवकर मार्गी लावली जातील, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

पर्यटन विकासाची विविध पर्यटन स्थळांवर काम करताना त्या पर्यटन स्थळाची मालकी ही जलसंपदा, वनविभाग, पुरातत्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक ट्रस्ट यांची असते. त्यामुळे आंतर विभाग समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यटन विकास प्राधिकरण’ निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येईल असेही ह्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे श्री.आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पुढील पन्नास वर्षाचा विचार करुन नाशिक जिल्ह्याचा पर्यटनांचा शाश्वत विकासावर भर देण्यात येईल.तसेच इको टुरिझम, धार्मिक पर्यटन व पर्यटन स्थळी मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.