आरोग्य

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण पर्यटनासह वसतीगृहे सुरू करावीत; पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.31 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांसह सर्व प्रकारची वसहतीगृहे खुली करावीत. तसेच जिल्ह्यातील कमी होणारी ॲक्टिव्ह रूग्णांची टक्केवारी व रूग्णालयात दाखल रूग्णांची संख्याही आश्वासक आहे. शासनाकडून कायमच मोफत स्वरूपात लस मिळेल असे समजू नये, नागरीकांनी शासनामार्फत मोफत उपलब्ध असलेल्या लसीकरणाचा वेळीच लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावंडे, निलेश श्रींगी, भिमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अनंत पवार, डॉ.उत्कर्ष दुधेडीया, डॉ. सपना ठाकरे व विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, रुग्ण संख्या १८ हजार ५००  वरून १५ हजार ५०० वर आलेली असून ३ हजाराने रुग्णसंख्येत घट झाली आहे. तसेच पॉझिटिव्हीटी दर ४१ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आला आहे. सध्या म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही. त्याचप्रमाणे शाळा सुरू झालेल्या असून शाळांमध्ये अद्याप मुले बाधित झालेले नाहीत. हे चित्र अत्यंत आश्वासक आहे. यासोबतच मालेगावसह येवला, नांदगाव, निफाड, सिन्नरसह इतर तालुक्यात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वायंसेवी संस्थांच्या माध्यमातून व्हॅक्सिन ऑन व्हिल ही मोहिम राबविण्यात येत आहे. मालेगाव मध्ये लसीकरण कमी असल्याने त्याठिकाणी येणाऱ्या काळात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले.

खुल्या पर्यटन स्थळावरील निर्बंध उठविण्यात येत असून मात्र याठिकाणी कोरोना नियमांचे बंधने कायम राहतील. सशुल्क प्रवेशाची बंदिस्त पर्यटन स्थळे मात्र शासन अधिसूचना सुधारित होईपर्यंत बंदच राहतील.  विद्यार्थ्यांची अडचण होत असून वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय आपत्ती नियंत्रण प्राधिकारणाकडून आजच घेण्यात आलेला आलेला आहे, त्यादृष्टिने सर्व यंत्रणांनी आपापल्या स्तरावर कार्यवाहक करण्याचेही आवाहन यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले.

मृत पावलेल्या रूग्णांच्या वारसांची 8 हजार 900 प्रकरणे मंजूर – सूरज मांढरे

कोरोनामुळे मृत पावलेल्या रूग्णांच्या 13 हजार 520 वारसांनी सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 8 हजार 959 अर्जांची पडताळणी करून प्रकरणे मंजुर करण्यात आली आहेत. तसेच उर्वरित प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करून सदर प्रकरणे  शासनास सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पांण्डेय, नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नितीन गावंडे, निलेश श्रींगी, भिमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. अनंत पवार, डॉ.उत्कर्ष दुधेडीया, डॉ. सपना ठाकरे व विविध यंत्रणांचे प्रमुख यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सद्यस्थितीची माहिती विषद करून चर्चेत सहभाग घेतला.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.