आरोग्य

नाशिक महापालिकेसह इतर निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची “स्वबळा”ची तयारी-पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिकः आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर झाल्या असून, लवकरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. सर्वांची मते जाणून घेण्यात येत असून, सन्मानपूर्वक आघाडीस प्राधान्य देण्यात आहे. मात्र, आघाडी न झाल्यास महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केलेली आहे, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आघाडीतील घटकपक्षांना दिला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रवादी भवन नाशिक येथील कार्यालयात बैठक घेत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीती सहयोगी पक्षांना हा इशारा दिलेला आहे.
आजच्या या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लवकरच महानगरपालिका ,जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. आगामी निवडणुका लढताना भाजप वगळता समविचारी पक्ष व गटांशी आघाडी करण्यास आमचे प्राधान्य असणार आहे. मात्र, सन्मानपूर्वक आघाडी न झाल्यास संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येत असून, प्रभागरचनेचा सूक्ष्म अभ्यास करून नागरिकांची मते जाणून घेतली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, आपल्या कामकाजामुळे भाजपची हवा देशपातळीवरच कमी झालेली आहे. तसेच नाशिक महानगरपालिकेत भाजपच्या कामकाजामुळे नागरिकांमध्ये देखील रोष असून, शहरात देखील पूर्वीसारखी कोणतीच लाट राहिलेली नाही. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत निकाल लवकरच येईल. परंतु, निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशाही सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी केली.आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला नागरिकांची पसंती असून, शहरात पक्षाची ताकद अधिक वाढलेली आहे. त्यानुसार निवडणुकीची तयारी करण्यात येत असून, अधिक गतीने काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. आजच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे निवडणूक लढविण्याचा उत्साह व जोश संचारला असल्याचे दिसून आले.

उपस्थित पदाधिकाऱ्यांची मते घेतली जाणून

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी विभागानुसार नेमण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रभाग रचना जाहीर झाली असून, त्याचा सूक्ष्म अभ्यास करून माहिती गोळा करण्यात यावी. आघाडी होवो ना होवो संपूर्ण जागांवर निवडणुका लढण्याची तयारी करावी. विभागवार जबाबदारी घेऊन निवडणुकीचे कामकाज करण्यात यावे. पक्ष अतिशय मजबुतीने उभा असून पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केलेली आहे.

यांची बैठकीला होती उपस्थिती

बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार,नगरसेविका सुषमा पगारे,
देविदास पिंगळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, महापालिका गटनेते गजानन शेलार, डॉ. शेफाली भुजबळ, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब कर्डक, शिवाजी सहाणे, समिना मेमन, जगदीश पवार, सुफी जीन, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेल शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, ओबीसीसेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, धनंजय निकाळे, सरचिटणीस संजय खैरनार, प्रांतिक सदस्य महेश भामरे, विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, मकरंद सोमवंशी, मनोहर कोरडे, जीवन रायते, मुजाहित शेख, बाळसाहेब गिते, माजी मनपा विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, सुरेखा निमसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.