निवडणूकमुंबई

निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य – मुख्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. १२ : राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक सामुग्रीचे वाटप सुरू केले आले आहे. नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या निगराणीखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ही सामुग्री निर्धारित वेळेत पाठवण्याची प्रक्रिया दोन दिवसात पार पाडली जाणार आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाचे सहसंचालक (माध्यमे) यांनी दिली. निवडणूक प्रक्रियांची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य असल्याचे गौरवोद्गार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काढले.

विविध राज्यातून आलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, सर्व निवडणूक प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडून कोणत्याही त्रुटीविना वेळोवेळी निवडणूक सामुग्री पाठवणे आणि निवडणूक घेणे, हे निवडणूक आयोगाचे वैशिष्ट्य आहे. सुनिश्चित सूचनाप्रणाली, सुविहीत प्रमाणित कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करुनच प्रत्येक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागते आणि ते साध्य करून भारत निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याची एक सुस्थापित पद्धती विकसित केलेली आहे. सर्व कार्यपद्धतींसह मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून निवडणूकविषयक सामुग्री आपापल्या राज्यात न्यावी. तसेच मतपेट्यांसह मत पत्रिका आदी सामुग्री भांडारात ठेवतानाही दक्ष राहून मार्गदर्शक तत्वे आणि कार्यपद्धती अमलात आणावी, अशा सूचना श्री. कुमार यांनी दिल्या.

निवडणूकविषयक सामुग्री दिल्ली प्रदेशासह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेश आणि सर्व विधानसभा सचिवालयांना पाठवण्यात येत आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयातून ही सामुग्री ताब्यात घेणे आयोगाने बंधनकारक केले असून यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचाही समावेश असणे आवश्यक आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.