निवासी डाॕक्टरांनी रूग्णांना जीवदान देऊन मोलाचे कार्य केले- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई, दि. 5 : कोरोना संक्रमण काळात राज्यातील निवासी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना सामोरे जात त्यांची सेवा करण्याचे मोलाचे कार्य केले असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड) च्या वतीने राजभवन येथे राज्यातील ५० निवासी डॉक्टरांचा कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, ज्यावेळी आपण रुग्णांची सेवा करता त्यावेळी रुग्ण मनापासून आपल्याला आशिर्वाद देतात. रुग्णांकरिता डॉक्टर देवदूत असतात.
सर्व निवासी डॉक्टरांनी ध्येय्य, समर्पण भाव व निष्ठेने कार्य केल्यामुळेच देशातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला. नवा कोरोना विषाणूवर देखील आपण निश्चितपणे विजय मिळवू, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला.
‘सेवा परमो धर्म:’ हे आपल्या देशातील तत्वज्ञान आहे. ‘मनुष्य सेवा हीच ईश सेवा आहे’ असे मानले गेले आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचवून निवासी डॉक्टरांनी हे तत्वज्ञान अधोरेखित केले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
“आठ-आठ तास करोना रुग्णाजवळ बसून जीव वाचवले” : डॉ. तात्याराव लहाने
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून रुग्णांना सेवा देणारे निवासी डॉक्टर्स सच्चे कोरोना योद्धे असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
निवासी डॉक्टरांनी पीपीई कीट घालून अतिदक्षता विभागात रुग्णांजवळ बसून रुग्णांची सेवा केली. आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण कोरोना काळात मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संप न करून शासनाला सहकार्य केल्याचे डॉ.लहाने यांनी सांगितले.
निवासी डॉक्टरांच्या कामाला तोड नाही असे सांगताना राज्यपाल कोश्यारी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे सर्व वैद्यकीय परीक्षा नीटपणे पार पडल्या, असे आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.
निवासी डॉक्टरांचा सत्कार राज्यपालांनी केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले.
मार्डचे अध्यक्ष डॉ.राहुल वाघ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.