केंद्रीय योजना

परस्पर संवाद घडवू शकणाऱ्या आभासी वास्तुसंग्रहालयामध्ये देशातील शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या साहसाच्या वीरगाथा होणार प्रदर्शित

नवी दिल्‍ली
 
देशभरात भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारताच्या बहाद्दर वीरांच्या साहसी कृत्यांचा गौरव करण्यासाठी देशातील शौर्य पुरस्कार विजेत्यांचे कार्य दर्शविणारे परस्परसंवादी, आभासी वस्तुसंग्रहालय निर्माण करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे. भारतीय संरक्षण सामग्री उत्पादक संस्था(SIDM)  आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांच्यासोबत कोणत्याही आर्थिक व्यवहाराशिवायच्या भागीदारीत केंद्रीय संरक्षण मंत्रालय, ह्या प्रकल्पाची निर्मिती करणार आहे. यासाठी मंजुरी देणारे पत्र, केंद्रीय संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार यांनी नवी दिल्ली येथे 30 जून 2021 ला SIDMचे अध्यक्ष जयंत पाटील यांना सुपूर्द केले आहे. या प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.  
या आभासी वस्तुसंग्रहालयाचे आयोजन शौर्य पुरस्कार पोर्टल  (https://www.gallantryawards.gov.in/)  तर्फे होईल. यामध्ये, प्रदर्शन इमारत, वॉल ऑफ फेम, पुरस्कार विजेत्यांची छायाचित्रे आणि माहिती असलेले प्रदर्शन, युध्द स्मृतीस्थळांची सहल आणि ‘द वॉर रूम’नावाचे शौर्यकथा दाखविणारे प्रेक्षागृह यांचा त्रिमितीय अनुभव देणारी सुविधा असेल. या वस्तुसंग्रहालयात, युद्धातील वीरांच्या कथा जिवंत करून दाखविणाऱ्या अनेक अॅनिमेशन व्हिडिओंचा समावेश असेल. त्याच सोबत, शूरवीरांना श्रद्धांजली देणारे संदेश लिहून त्यांना सन्मानपूर्वक आदरांजली वाहण्याची सोय देखील या वस्तुसंग्रहाला भेट देणाऱ्यांसाठी करण्यात आली आहे.
या प्रसंगी बोलताना संरक्षण सचिव म्हणाले की, शौर्य पुरस्कार विजेत्यांची साहसी कृत्ये जिवंतपणे समोर दर्शविण्यात तसेच अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून देशाचा बचाव करण्यासाठी त्यांनी दिलेले असीम योगदान आणि दुर्दम्य स्फूर्ती यांची ओळख पटवून देण्यात हा उपक्रम  मोठे योगदान देईल. हा प्रकल्प आपल्या कृतज्ञ देशाला या वीरांना श्रद्धांजली वाहणे शक्य करून देईल आणि त्यासोबतच, देशसेवेसाठी या वीरांनी केलेल्या धाडसी कृत्यांना वाहिलेली ही एक योग्य आदरांजली असेल. 
संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार म्हणाले की, हा प्रकल्प, अशा सायबर वस्तुसंग्रहालय प्रकारातील युध्द वीरांचा सन्मान करणारा पहिलाच प्रकल्प असेल आणि हा प्रकल्प देशवासियांना, विशेषतः युवा वर्गाला देशाची सेवा प्रेरणा देण्याच्या दृष्टीने शौर्य पुरस्कार पोर्टलचे मूल्यवर्धन करणारा ठरेल. संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि देशवासियांच्या मनात त्यांच्याविषयी असणारा सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हे देखील या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी SIDM ने दिलेल्या स्वयंसेवी योगदानाबद्दल, डॉ.अजय कुमार यांनी संस्थेचे आभार मानले. 
संरक्षण दलांना सन्मानित करणाऱ्या या प्रतिष्ठित आणि एकमेवाद्वितीय प्रकल्पासाठी SIDM ची निवड केल्याबद्दल, SIDM चे अध्यक्ष जयंत डी. पाटील यांनी या जबाबदारीचा स्वीकार करत संरक्षण सचिवांचे आभार मानले. या प्रकल्पाची सुरुवात, भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव आणि 1971 च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सव अशी दुहेरी पर्वणी साधून होत आहे आणि संरक्षण दलांचा सन्मान करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे असे ते म्हणाले. या प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीच्या दिशेने  SIDM तत्परतेने कार्य करेल आणि भविष्यातही या मंचावरील कार्यक्रमात नियमितपणे सुधारणा करीत राहील असे त्यांनी पुढे सांगितले. केंद्रीय संरक्षण मंत्रालय, SIDM आणि CII यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.