मंत्रीमंडळ निर्णय

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी; पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होणार

मुंबई, दि. 3 : पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ८९ कोटी ४९ लाख १९ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील नवीन कामांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील विविध 115 स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करून पर्यटकांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना सर्वाधिक रोजगार निर्मिती क्षमता असलेल्यांपैकी या क्षेत्राकडे पर्यटकांना आकर्षित करून त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील शांतीवन (रॉक) उद्यान, गार्डन भांडुपेश्वर तलाव, मढ येथील पुरातन किल्ले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, छोटा काश्मिर, ठाणे जिल्ह्यातील खिडकाळी शिवमंदीर, रायगड जिल्ह्यातील नेरळ, किहीम येथील डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र, उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ, मौजे साखर येथील सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ, घागरकोंड येथील झुलता पूल, दर्या सारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर, उंबरखिंड येथील शिवतीर्थ समरभूमी, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ला, भाट्ये समुद्र किनारा, आरे-वारे समुद्र किनारा, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिंधुदूर्ग किल्ला, नाशिक जिल्ह्यातील कुसुमाग्रजांचे स्मारक, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, सातारा जिल्ह्यातील पांचगणी, अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा प्रवेश रस्ता, परभणी जिल्ह्यातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आदींसह राज्यातील विविध 115 ठिकाणी सुशोभिकरण, नवीन उपक्रम राबविणे तसेच पर्यटकांसाठी सुविधा निर्मिती केली जाणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.