पाळधीच्या मयत विवाहितेच्या पाठोपाठ पतीच्याही मृत्यूने खळबळ

धरणगाव – तालुक्यातील पाळधी येथील प्रशांत विजयसिंग पाटील या तरूणाचे गावातील आरती विजय भोसले हिच्याशी प्रेमसंबंध होते.प्रेमाच्या जवळीकीतून दोघांनी पळून जाऊन कोर्टात प्रेमविवाह केलेला होता. 7-8 दिवसांपूर्वी ते घरी परतले होते. यानंतर अचानक काल सकाळी आरतीचा संशयास्पद मृत्यू झालेला होता.तसेच तिचा मृतदेह विचित्र अवस्थेत सापडलेला होता. तर तिचा पती प्रशांत हा देखील मागील खोलीत बेशुध्दावस्थेत आढळून आलेला होता. आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळीनेच घात केल्याचा दावा तिच्या माहेरच्यांनी करून तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला होता.यामुळे तणावाचे वातावरण होते.अखेर या प्रकरणी मयत आरतीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी माहेरच्या लोकांना दिल्यानंतर तिचे पार्थिव स्विकारून सायंकाळी उशीरा त्या विवाहितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. दरम्यान, मयत विवाहितेच्या पतीला देखील रूग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. उपचार सुरू असतांनाच तिचा पती प्रशांत विजयसिंग पाटील याची आज सकाळी प्राणज्योत मावळली. त्याचा मृत्यू विषबाधेनेच झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. प्रेमविवाह करून नुकताच संसार सुरू करणाऱ्या या विवाहितेच्या पाठोपाठ तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे.या घटने प्रकरणी आज पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे या घटनेची गुंतागुंत वाढून हा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक बनल्याचे दिसत आहे.