पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांचा अविश्वसनीय विश्वविक्रम

पुणे (वृत्त संस्था )- पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना आयर्न मॅन हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांची आज नोंद झालेली आहे. अशी नोंद होणारे ते पहिले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. हा मान अद्यापपावेतो कोणत्याही भारतीय सैन्य किंवा निमलष्करी दलातील अधिकाऱ्यांना देखील मिळालेला नाही. हा असामान्य विक्रम आपल्या नावावर होण्यासाठी पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतलीय. त्यामुळे त्यांचं आता संपूर्ण देशभरातून कौतुक होत आहे. त्यांनी आज 20 जानेवारी रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिलेली आहे.

कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पोस्टमध्ये हा सन्मान देशाला, भारतीय पोलीस दलातील सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देण्या सर्वांना समर्पित केलाय. त्यांनी 2017 मध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन हा जगातील सर्वात कठिण आणि आव्हानात्मक एक दिवसीय खेळ प्रकार पूर्ण केला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकाला 3.8 किमी पोहणे, 180.2 किमीची सायकलिंग आणि 42.2 किमी धावावं लागतं. हे सर्व केवळ 16 ते 17 तासांच्या कालावधीतच पूर्ण करायचं असतं.