क्राईम

पुण्यात चक्क मोटारीत गर्भलिंगनिदान चाचणीचा पर्दाफाश,तिघांना अटक

पुणे दि-14 चक्क मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आलेला आहे. इंदापूर पोलीस आणि वैद्यकीय विभागाने या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश केलेला आहे.पुणे ग्रामिण पोलिसांनी कारवाई करत यात सहभागी असलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांच्याजवळील मोटार आणि गर्भलिंग निदान यंत्रणा पोलीसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी प्रवीण पोपटराव देशमुख (वय 32, रा. राजळे, सातारा), तौशिफ अहमद शेख (वय 20, दोघे रा. राजळे, सातारा) तसेच आणखी एका व्यक्ती विरोधात इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण देशमुख एका रोगनिदान केंद्रात तंत्रज्ञ आहे. त्याच्याविरोधात गर्भधारण पूर्व प्रसव, पूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) 1994 च्या सुधारित 2003 कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
चक्क मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याची माहिती इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर यांना मिळालेली होती. त्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने सापळा रचत डॉ. खामकर आणि डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. श्रीकृष्ण खरमाटे, डॉ. अमोल खनावरे यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञ आणि पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
इंदापुर-अकलूज रस्त्यावर दुचाकीवरून हे दाम्पत्य आलेले होते. दाम्पत्य मोटारीत बसले आणि मोटार भरधाव वेगाने निघाली. भांडगाव परिसरात एका ओढ्याजवळ मोटार थांबली. पोलीस आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे पथकही तेथे दाखल झाले. त्यावेळी मोटारीची तपासणी केली असता बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविले जात असल्याचे आढळले. त्यानंतर मोटारचालक शेख, प्रवीण देशमुख तसेच पत्नीची गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेतले.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.