राजकीयशासन निर्णय

पूर नियंत्रणासाठी समन्वय ठेवा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 1 : आगामी पावसाळ्यात पूराचे नियोजन करताना महसूल, पोलीस, जलसंपदा यांसह सर्वच विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज संभाव्य पूर नियंत्रणासाठी केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सचिव विलास राजपूत, सहसचिव तथा मुख्य अभियंता अतुल कपोले आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, धरणाच्या जलाशयात येणारे पाणी व केला जाणारा विसर्ग यावर सातत्याने लक्ष ठेवून राहायला हवे. धरणातून पाणी किती सोडण्यात येणार आहे याबाबतची माहिती सतत विविध विभागांना द्यायला हवी. कमी कालावधीत जास्त पाऊस झाला आणि अचानकपणे धरणातून जास्त पाणी सोडण्याची आवश्यकता भासल्यास त्याची पुरेशी माहिती दिली जावी. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठीचे नियोजन करुन ठेवायला हवे.

वारंवार पूर येणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ज्या जिल्ह्यात आंतर राज्य मुद्दे आहेत तिथे त्या त्या राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

विदर्भात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो. हा पूर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व पर्याय अंमलात आणावे, नदीनाल्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण करावे, शेजारच्या राज्यांशी संपर्कात राहून तिथल्या धरणाच्या पाण्याच्या नियोजनावर लक्ष ठेवावे, असे त्यांनी सूचित केले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.